स्वच्छता अभियानामुळे शिवाजी विद्यापीठाचा परिसर चकाचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 12:23 PM2019-10-03T12:23:44+5:302019-10-03T12:26:08+5:30
विद्यार्थी, प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शिवाजी विद्यापीठातील स्वच्छता अभियानात श्रमदान करून महात्मा गांधी यांना बुधवारी अभिवादन केले. सकाळी साडेसात ते १0 या वेळेतील अभियान राबविण्यात आले. त्यामध्ये रस्त्याकडेला वाढलेली काटेरी झुडपे, गवत, परिसरात पडलेला कचरा साफ केला; त्यामुळे हा परिसर चकाचक झाला.
कोल्हापूर : विद्यार्थी, प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शिवाजी विद्यापीठातील स्वच्छता अभियानात श्रमदान करून महात्मा गांधी यांना बुधवारी अभिवादन केले. सकाळी साडेसात ते १0 या वेळेतील अभियान राबविण्यात आले. त्यामध्ये रस्त्याकडेला वाढलेली काटेरी झुडपे, गवत, परिसरात पडलेला कचरा साफ केला; त्यामुळे हा परिसर चकाचक झाला.
या अभियानात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे, आदी प्रमुख अधिकारी सहभागी झाले. मुख्य प्रशासकीय इमारतीमधील प्रशासकीय सेवकांनी त्यांना नेमून दिलेल्या एन. सी. सी. भवन गेटपर्यंतच्या परिसरामध्ये, तर अधिविभागांनी आपापल्या परिसराची स्वच्छता केली.
गवत, झुडपे, अशा स्वरूपातील ४० ट्रॉली कचरा संकलित करण्यात आला. अभियानानंतर मुख्य इमारतीमध्ये कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी प्रमुख उपस्थित होते. गांधी अभ्यासकेंद्राच्या संचालक डॉ. भारती पाटील यांनी उपस्थितांना अहिंसा, शांततेची तसेच स्वच्छतेची शपथ दिली.
यावेळी विद्यापीठातील अधिष्ठाता डॉ. पी. डी. राऊत, ए. एम. गुरव, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर. व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी. के. गायकवाड, उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, आदी उपस्थित होते. दरम्यान, विद्यापीठाच्या क्रीडा अधिविभागातर्फे आयोजित फिट इंडिया प्लॉगिंग दौड उत्साहात पार पडली. त्यात विद्यार्थी, विद्यार्थिनी, अधिकारी, शिक्षक, कर्मचारी सहभागी झाले.
गेल्या चार वर्षांपासून स्वच्छता अभियानामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकमुक्ती करण्यात आलेली असल्यामुळे, तसेच परिसरात वावरणाºया व्यक्तींच्या सजगतेमुळे विद्यापीठाचा परिसर हा बहुतांश प्लास्टिकमुक्त बनला आहे. तथापि, अलिकडेच सिंथेटिक ट्रॅकवर झालेल्या काही क्रीडा स्पर्धांमुळे त्या मैदानाच्या परिसरात चॉकलेट-बिस्कीटांचे रॅपर मोठ्या प्रमाणात पडले होते. ही बाब लक्षात येऊन कुलगुरू डॉ. शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. शिर्के, कुलसचिव डॉ. नांदवडेकर यांनी त्या परिसरातील प्लास्टिक कचरा जमा करण्यास प्राधान्य दिले. अर्ध्या तासात तेथील प्लास्टिक कचरा संकलित केला.