सलग दुसऱ्या वर्षी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ ऑनलाइन, जीवशास्त्रज्ञ दिनकर साळुंखे प्रमुख पाहुणे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 12:47 PM2022-03-02T12:47:01+5:302022-03-02T12:51:31+5:30
राष्ट्रपती सुवर्णपदक आणि कुलपती मेडल विजेत्या विद्यार्थ्यांची घोषणा येत्या दोन दिवसांत होणार
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी शिवाजी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. शनिवारी (दि. ५ मार्च) सकाळी अकरा वाजता होणाऱ्या या समारंभाचे जीवशास्त्रज्ञ डॉ. दिनकर साळुंखे प्रमुख पाहुणे असणार आहेत. अध्यक्षस्थानी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, तर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत प्रमुख उपस्थित असणार आहेत.
५८ व्या दीक्षांत समारंभांची विद्यापीठाकडून तयारी सुरु आहे. यासाठी ऑनलाइन उपस्थित राहण्याबाबत राज्यपाल कोश्यारी, मंत्री सामंत आणि जीवशास्त्रज्ञ साळुंखे यांनी विद्यापीठाला कळविले आहे. त्यानुसार विद्यापीठाने शनिवारी समारंभ घेण्याचे नियोजन केले आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे जीवशास्त्रज्ञ डॉ. साळुंखे हे नवी दिल्लीतील इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनिअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजीचे संचालकपदी कार्यरत आहेत. त्यांनी मॉलिक्युलर बायोटेक्नॉलॉजी विषयातून पीएच.डी.चे संशोधन केले आहे. त्यांचा सन २००० मध्ये शांतीस्वरूप भटनागर विज्ञान आणि तंत्रज्ञान पुरस्काराने सन्मान झाला आहे. त्यांचा जन्म बेळगावमध्ये झाला असून, धारवाडमधील कर्नाटक विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.
६० हजार विद्यार्थ्यांचे अर्ज
दरम्यान, यावर्षी पदवी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सुमारे ६० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. राष्ट्रपती सुवर्णपदक आणि कुलपती मेडल विजेत्या विद्यार्थ्यांची घोषणा येत्या दोन दिवसांत विद्यापीठाकडून होणार आहे.