शिवाजी विद्यापीठ दीक्षांत समारंभ: महेश बंडगर यांना राष्ट्रपती, सोहम जगतापांना कुलपती पदक
By संदीप आडनाईक | Published: March 27, 2023 05:04 PM2023-03-27T17:04:39+5:302023-03-27T17:05:00+5:30
सोहळ्याची तयारी पूर्ण
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा ५९ वा दीक्षांत समारंभ येत्या बुधवार, दि. २९ मार्च रोजी होणार आहे. यावेळी प्राणीशास्त्र विभागाचा विद्यार्थी महेश बंडगर यांना राष्ट्रपती पदक आणि एम ए मराठीत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या उरुण इस्लामपूर येथील सोहम जगताप यांना कुलपती पदक देण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिवाजी विद्यापीठाचा हा दीक्षांत समारंभ १६ फेब्रुवारी रोजी होणार होता. मात्र, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप आणि माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निमंत्रित केल्यामुळे होणाऱ्या वादामुळे हा सोहळा स्थगित करण्यात आला होता. यानंतर नवे राज्यपाल रमेश बैस यांची कुलपती म्हणून निवड झाल्यानंतर त्यांच्या मान्यतेने हा सोहळा २९ मार्च रोजी आयोजित करण्यात आला. या सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे.
दीक्षांत समारंभासाठी विद्यापीठाने ४२ विविध समित्या स्थापन केल्या असून, या समारंभात एकूण ६६,४५७ जणांना पदवी देण्यात येणार आहे. यातील १६,५९४ विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आणि ४९,८६३ विद्यार्थ्यांना टपालाने पदवी देण्यात येणार आहे. याशिवाय ३०० जणांना पीएच.डी. दिली जाईल. यातील ४६ जणांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रत्यक्ष पदवी दिली जाणार आहे.