शिवाजी विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर परीक्षा २२ मार्चपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 12:46 PM2021-03-02T12:46:08+5:302021-03-02T12:49:13+5:30
Shivaji University Exam Kolhapur-शिवाजी विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या हिवाळी सत्रातील परीक्षा दि. २२ मार्चपासून सुरू करण्यात याव्यात. ऑनलाइन, ऑफलाइन पद्धतीने होणाऱ्या परीक्षांसाठी ओएमआर शीटचा वापर करावा. प्रात्यक्षिक परीक्षा दि. २१ मार्चपूर्वी विद्यापीठातील अधिविभाग आणि महाविद्यालयांनी पूर्ण कराव्यात, आदी विविध शिफारसी विद्या परिषद सदस्या डॉ. मेघा गुळवणी यांच्या अध्यक्षतेखालील विद्यापीठ परीक्षा नियोजन समितीने केल्या.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या हिवाळी सत्रातील परीक्षा दि. २२ मार्चपासून सुरू करण्यात याव्यात. ऑनलाइन, ऑफलाइन पद्धतीने होणाऱ्या परीक्षांसाठी ओएमआर शीटचा वापर करावा. प्रात्यक्षिक परीक्षा दि. २१ मार्चपूर्वी विद्यापीठातील अधिविभाग आणि महाविद्यालयांनी पूर्ण कराव्यात, आदी विविध शिफारसी विद्या परिषद सदस्या डॉ. मेघा गुळवणी यांच्या अध्यक्षतेखालील विद्यापीठ परीक्षा नियोजन समितीने केल्या.
या हिवाळी सत्रामध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखेच्या विविध पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या ऑक्टोबर सत्रातील एकूण ६२१ परीक्षा होणार आहेत. त्यात प्रथम वर्षाच्या परीक्षांची संख्या १०० आहे. ८० टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा घेण्याचे नियोजन विद्यापीठाने यापूर्वी केले आहे. या विविध अभ्यासक्रमांच्या लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक, त्यांचे स्वरूप, पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या परीक्षांची जबाबदारी निश्चिती करण्याबाबत गुळवणी समितीची विद्यापीठात बैठक झाली.
तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा या ऑफलाइन अथवा ऑनलाइन यापैकी ज्या पद्धतीने शक्य होईल तशी विद्यापीठातील अधिविभाग, संलग्नित महाविद्यालयांनी दि. २१ मार्चपूर्वी घ्यावी. पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या परीक्षा अधिविभाग, महाविद्यालयांनी त्यांच्या पातळीवर घ्याव्यात. अभ्यासमंडळांनी प्रश्नपत्रिका तयार कराव्यात.
या प्रश्नपत्रिका आणि त्या सोडविण्यासाठी ओएमआर शीट विद्यापीठाकडून पुरविण्यात याव्यात आदी शिफारसी विद्यापीठाला या गुळवणी समितीच्या बैठकीत करण्यात आल्या. यावेळी डॉ. गुळवणी, डॉ. एच. एन. मोरे, जी. एस. गोकावी, एस. बी. भांबर, डी. एच. दगडे, पी. बी. चव्हाटे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक जी. आर. पळसे आदी उपस्थित होते.
५० गुणांच्या पेपरसाठी एक तास
या परीक्षांसाठी २५ वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचा ५० गुणांचा पेपर (प्रश्नपत्रिका) असेल. ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने होणाऱ्या परीक्षेसाठी एक तासाची वेळ असणार आहे. इंजिनिअरिंग, फार्मसी, लॉ, मॅनेजमेंट, शिक्षणशास्त्र, आर्किटेक्चर या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा क्लस्टर पद्धतीने होतील. त्याची जबाबदारी शाखानिहाय प्रत्येकी एका महाविद्यालयांकडे देण्यात येईल.
बारावीची परीक्षा सुरू होण्यापूर्वी पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्याच्यादृष्टीने वेळापत्रक निश्चित केले जाईल. आमच्या समितीने घेतलेले निर्णय, केलेल्या शिफारशींचा अहवाल विद्यापीठाला सादर केला आहे.
-डॉ. मेघा गुळवणी,
अध्यक्ष, विद्यापीठ परीक्षा नियोजन समिती
आकडेवारी दृष्टिक्षेपात
- परीक्षांची संख्या : ६२१
- विद्यार्थ्यांची संख्या : सुमारे दोन लाख