शिवाजी विद्यापीठाचे मानांकन घसरले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 12:57 AM2019-04-09T00:57:55+5:302019-04-09T00:58:00+5:30

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ‘नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेम’चे (एनआयआरएफ) मानांकन सोमवारी जाहीर केले आहे. त्यातील पहिल्या ...

Shivaji University downgrades! | शिवाजी विद्यापीठाचे मानांकन घसरले!

शिवाजी विद्यापीठाचे मानांकन घसरले!

Next

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ‘नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेम’चे (एनआयआरएफ) मानांकन सोमवारी जाहीर केले आहे. त्यातील पहिल्या शंभर विद्यापीठ-शैक्षणिक संस्थांच्या यादीत शिवाजी विद्यापीठाचा समावेश नाही. गेल्यावर्षी मानांकनाच्या १०१-१५० या रँकबँडमध्ये असणाऱ्या विद्यापीठाचे नाव यावर्षी १५१-२०० रँकबँडच्या यादीत आहे.
देशातील सर्व विद्यापीठे, शैक्षणिक संस्थांचे अध्यापन-अध्ययन पद्धती, रोजगार उपलब्धता, निधी खर्चाचे प्रमाण, पेटंट, परदेशातील विद्यार्थ्यांचे प्रमाण, आदी विविध निकषांच्या आधारे मूल्यांकन करून मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून मानांकन (रँकिंग) जाहीर करण्यात येते. त्यानुसार विद्यापीठ, अभियांत्रिकी, कॉलेज, व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र, विधी (लॉ), आर्किटेक्चर, मेडिकल या गटनिहाय मानांकन सोमवारी जाहीर केले. यावर्षी १५१-२०० रँकबँडच्या यादीत शिवाजी विद्यापीठाच्या नावाचा समावेश आहे. मात्र, नेमके कोणते मानांकन मिळाले आहे. त्याची माहिती त्याठिकाणी उपलब्ध नाही.
गेल्यावर्षीदेखील विद्यापीठाचा मानांकनप्राप्त शंभर संस्था-विद्यापीठांमध्ये सहभाग झाला नव्हता. यावर्षी त्यापेक्षाही खाली नाव असल्याचे दिसत आहे. त्याकडे विद्यापीठाने गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.
विद्यापीठ माहिती मागविणार
या मानांकनासाठी यावर्षी शिवाजी विद्यापीठाने अर्ज केला होता. जाहीर झालेल्या मानांकनामध्ये दीडशेनंतरच्या यादीत शिवाजी विद्यापीठाचा समावेश आहे. विद्यापीठाने जी माहिती सादर केली होती, तिला कशा पद्धतीने गुणांकन मिळाले आहे, याची माहिती विद्यापीठ हे ‘एनआयआरएफ’कडून मागविणार असल्याचे प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी सांगितले. ते म्हणाले, कोणत्या निकषामध्ये विद्यापीठ कमी पडले ते जाणून घेणार आहे. गेल्यावर्षी विद्यापीठाने माहिती मागविली होती. मात्र, ती प्राप्त झाली नाही.

भारती विद्यापीठ कॉलेज आॅफ फार्मसी ५४ वे
या मानांकनात फार्मसी कॉलेजच्या विभागात कोल्हापूरच्या भारती विद्यापीठ कॉलेज आॅफ फार्मसीने ५४ वे स्थान पटकाविले. या कॉलेजचा राज्यात ११ वा क्रमांक आहे. मानांकनामध्ये या कॉलेजला ३९.३३ गुण मिळाले आहेत. संशोधन, कौशल्यविकास योजना, आदींच्या जोरावर या कॉलेजने या मूल्यांकनात बाजी मारली आहे. दरम्यान, या मानांकनाच्या यादीमध्ये १०१ ते १५० संस्थांमध्ये कोल्हापूरच्या डी. वाय. पाटील एज्युकेशनल सोसायटीचा समावेश आहे.
तीन वर्षांपूर्वी २८ वा क्रमांक
शिवाजी विद्यापीठाने सन २०१५-१६ मध्ये या मूल्यांकनामध्ये देशात २८वा क्रमांक मिळविला होता. यानंतरच्या वर्षी विद्यापीठाने या मूल्यांकनासाठी अर्ज केला नव्हता. सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी विद्यापीठाने अर्ज केला. त्यावर्षी मूल्यांकनाच्या यादीतील १०१ ते १५० मध्ये विद्यापीठ होते. यंदा त्यामध्येदेखील घसरण झाली आहे.

Web Title: Shivaji University downgrades!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.