दिवाळीनंतर होणार शिवाजी विद्यापीठाच्या १३० परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 11:48 AM2019-10-15T11:48:25+5:302019-10-15T11:49:55+5:30
महापूर आणि ज्या अभ्यासक्रमांची उशिरा प्रवेश प्रक्रिया झाली आहे, अशा विविध १३० परीक्षा दिवाळीनंतर घेण्याचा निर्णय शिवाजी विद्यापीठाने घेतला आहे. त्यानुसार परीक्षा व मूल्यमापन मंडळाने वेळापत्रकात बदल केला आहे. सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. एम. ए. (भाषा), संस्कृत, ऊर्दू या अभ्यासक्रमांच्या परीक्षा आज, मंगळवारपासून सुरू होणार आहेत.
कोल्हापूर : महापूर आणि ज्या अभ्यासक्रमांची उशिरा प्रवेश प्रक्रिया झाली आहे, अशा विविध १३० परीक्षा दिवाळीनंतर घेण्याचा निर्णय शिवाजी विद्यापीठाने घेतला आहे. त्यानुसार परीक्षा व मूल्यमापन मंडळाने वेळापत्रकात बदल केला आहे. सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. एम. ए. (भाषा), संस्कृत, ऊर्दू या अभ्यासक्रमांच्या परीक्षा आज, मंगळवारपासून सुरू होणार आहेत.
विद्यापीठातर्फे पहिल्या सत्रात (हिवाळी) कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखेच्या विविध पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सुमारे सहाशे परीक्षा होणार आहेत. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील संलग्नित महाविद्यालयांतील सुमारे अडीच लाख विद्यार्थी-विद्यार्थिनी परीक्षा देणार आहेत. या परीक्षांची सुरुवात मंगळवारपासून होणार आहे.
बी.ए., बी.एस्सी., बीबीए, आदी अभ्यासक्रमांच्या परीक्षा बुधवार(दि. १६)पासून होईल. सकाळी आणि दुपारी या सत्रांमध्ये परीक्षा होतील. डिसेंबरमध्ये शेवटच्या टप्प्यात एमबीए, अभियांत्रिकी, फार्मसी आणि नव्याने सुरू झालेल्या अभ्यासक्रमांच्या परीक्षा होणार आहेत.
या पहिल्या सत्रात विविध परीक्षांच्या पाच हजार प्रश्नपत्रिका या ‘एसआरपीडी’ प्रणालीद्वारे परीक्षा केंद्रांवर पाठविण्यात येणार आहेत. दरम्यान, विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विविध महाविद्यालयांमध्ये परीक्षांची तयारी सोमवारी सुरू होती.
विद्यार्थ्यांनी खात्री करावी
पहिल्या सत्रातील परीक्षांची तयारी पूर्ण झाली आहे. महापूर आणि ज्या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरू झाली आहे. अशा अभ्यासक्रमांच्या १३० परीक्षा दिवाळीनंतर घेण्यात येणार आहेत. पूर्वनियोजनानुसार या परीक्षा १५ आॅक्टोबरपासून होणार होत्या. सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. विद्यार्थ्यांनी या बदलेले वेळापत्रक पाहून आपल्या परीक्षांची माहिती घ्यावी, खात्री करावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. जी. आर. पळसे यांनी सोमवारी केले.