शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा ‘ऑनलाईन’ होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:25 AM2021-04-08T04:25:17+5:302021-04-08T04:25:17+5:30
विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षा दि.२२ मार्चपासून ऑनलाईन, ऑफलाईन पद्धतीने सुरू झाल्या. विविध २५ अभ्यासक्रमांच्या परीक्षा पूर्ण झाल्या आहेत. सध्या ...
विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षा दि.२२ मार्चपासून ऑनलाईन, ऑफलाईन पद्धतीने सुरू झाल्या. विविध २५ अभ्यासक्रमांच्या परीक्षा पूर्ण झाल्या आहेत. सध्या द्वितीय वर्ष बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., एम.ए., एम.कॉम., एम.एस्सी, अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू होत्या. त्यातच राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने ब्रेक दी चेन अंतर्गत निर्बंधांबाबतची नवी नियमावली लागू केली. त्यावर पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्याबाबत शासनाचे स्पष्ट माहिती मिळेपर्यंत दि.१२ एप्रिलपर्यंतच्या परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आणि संचारबंदी, इतर निर्बंध विचारात घेता ऑफलाईन परीक्षा घेणे विद्यार्थी सुरक्षेच्यादृष्टीने उचित होणार नाही. त्यामुळे या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती परीक्षा मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी बुधवारी दिली.
चौकट -
सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पर्याय निवडावा
ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी ऑफलाईन परीक्षेचा पर्याय निवडला होता. ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा दि. ६ एप्रिलपासून ऑफलाईन सुरू होणार होत्या अशा सर्व विद्यार्थ्यांनी शनिवार (दि. १०) पूर्वी ऑनलाईन परीक्षेचा पर्याय निवडावा, असे आवाहन पळसे यांनी केले आहे. अपवादात्मक परिस्थितीनुसार जे विद्यार्थी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देणार असतील, तर त्यांची परीक्षा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.