Kolhapur: शिवाजी विद्यापीठाची बनावट प्रमाणपत्रे; आणखी २ गुन्हे दाखल, मोठे रॅकेट सक्रीय असल्याचा संशय

By उद्धव गोडसे | Published: July 20, 2024 03:37 PM2024-07-20T15:37:52+5:302024-07-20T15:38:16+5:30

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा लोगो आणि नावाचा वापर करून बनावट प्रमाणपत्र, गुणपत्रके तयार केल्याच्या दोन फिर्यादी राजारामपुरी पोलिस ठाण्यात ...

Shivaji University Fake Certificates; 2 more cases registered in kolhapur | Kolhapur: शिवाजी विद्यापीठाची बनावट प्रमाणपत्रे; आणखी २ गुन्हे दाखल, मोठे रॅकेट सक्रीय असल्याचा संशय

Kolhapur: शिवाजी विद्यापीठाची बनावट प्रमाणपत्रे; आणखी २ गुन्हे दाखल, मोठे रॅकेट सक्रीय असल्याचा संशय

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा लोगो आणि नावाचा वापर करून बनावट प्रमाणपत्र, गुणपत्रके तयार केल्याच्या दोन फिर्यादी राजारामपुरी पोलिस ठाण्यात शुक्रवारी (दि. १९) दाखल झाल्या. दिप्ती वसंत गावडे (मूळ रा. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग, सध्या रा. जोगेश्वरी, मुंबई) आणि प्रवीण बाबूराव शेलार (रा. कोकण नगर, चेंबूर, मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. बनावट क्रीडा प्रमाणपत्र तयार केल्याची एक फिर्याद गेल्या आठवड्यात दाखल झाली होती.

सावंतवाडी येथील दिप्ती गावडे या तरुणीने एका बँकेत नोकरीसाठी अर्ज केला होता. संबंधित बँकेने गावडे हिची कागदपत्रे तपासणीसाठी शिवाजी विद्यापीठाकडे पाठवल्यानंतर तिच्याकडील बी.कॉम. भाग तीनचे गुणपत्रक, पदवी प्रमाणपत्र आणि स्थलांतर दाखला बनावट असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. हा प्रकार २१ जून २०२४ रोजी निदर्शनास आला. याबाबत विद्यापीठातील कर्मचारी प्रल्हाद बाबूराव जाखले (वय ५२, रा. कसबा बावडा) यांनी फिर्याद दिली. 

दुस-या घटनेत प्रवीण शेलार याने एका खासगी कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला होता. त्याची प्रमाणपत्रे तपासणीसाठी विद्यापीठाकडे आल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. त्याने बी.कॉम. भाग १, २ आणि ३ चे गुणपत्रक, तसेच पदवीचे बनावट प्रमाणपत्र करून घेतल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. विद्यापीठाचे नाव आणि लोगोचा गैरवापर केल्याची फिर्याद कर्मचारी दीपक दत्तात्रय अडगळे (रा. मोरेवाडी, ता. करवीर) यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात दिली. बनावट प्रमाणपत्रे तयार केल्याचे तीन गुन्हे आठवडाभरात पोलिसात दाखल झाले, त्यामुळे यात मोठे रॅकेट सक्रीय असल्याचा संशय बळावला आहे.

आणखी एक शिगाव विद्यापीठ?

विद्यापीठाची बनावट प्रमाणपत्रे तयार करून देणारी टोळी शिगाव (ता. वाळवा, जि. सांगली) येथे सक्रीय होती. अनेकदा त्या टोळीवर कारवाया झाल्या. त्यानंतरही बनावट प्रमाणपत्रे तयार केली जात होती. तशीच टोळी पुन्हा सक्रीय झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांना सखोल चौकशी करावी लागणार आहे.

Web Title: Shivaji University Fake Certificates; 2 more cases registered in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.