शिवाजी विद्यापीठाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 02:05 PM2020-10-28T14:05:44+5:302020-10-28T14:08:12+5:30
Shivaji University, Education Sector, online, exam, kolhapurnews तीनवेळा लांबणीवर पडलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या अंतिम सत्र, वर्षाच्या परीक्षा मंगळवारपासून सुरू झाल्या. पहिल्या दिवशी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने एकूण १७७४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. विविध १८ विषयांच्या ९९ टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली. ही परीक्षा विना तक्रार पार पडली.
कोल्हापूर : तीनवेळा लांबणीवर पडलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या अंतिम सत्र, वर्षाच्या परीक्षा मंगळवारपासून सुरू झाल्या. पहिल्या दिवशी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने एकूण १७७४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. विविध १८ विषयांच्या ९९ टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली. ही परीक्षा विना तक्रार पार पडली.
कर्मचाऱ्यांचे आंदोलन, अतिवृष्टी, बी.एड्. सीईटी या कारणांमुळे ऑक्टोबरमध्ये विद्यापीठाकडून तीनवेळा अंतिम सत्र, वर्षाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने जाहीर केलेल्या नव्या वेळापत्रकानुसार मंगळवारपासून परीक्षा सुरू झाली.
या परीक्षेचे पहिल्या दिवशी बी. व्होक, एमबीए., बी. ए. इन ड्रेस मेकिंग, बॅचलर ऑफ इंटिरिअर डिझाईन, रूरल मॅनेजमेंट, औषध निर्माण शास्त्र, आदी १८ अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी १८०२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १७७४ जणांनी परीक्षा दिली. ऑफलाईन परीक्षा ही महाविद्यालयांमध्ये झाली. त्यात बी. व्होकसह अन्य काही अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता.
सकाळी ११ ते दुपारी १२, दुपारी १.३० ते २.३० आणि दुपारी ४.३० ते सायंकाळी पाच यावेळेत परीक्षा झाली. दरम्यान, ऑनलाईन परीक्षेबाबत तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास त्याचे निराकारण करण्यासाठी स्थापन केलेला आपत्ती निवारण कक्ष हा विद्यापीठातील संख्याशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेत कार्यान्वित झाला. त्याठिकाणी सकाळी साडेआठ ते दुपारी दीडपर्यंत तंत्रज्ञ, प्राध्यापक, कर्मचारी असे ३० जण थांबून होते.
वैध कारण असेल, तरच फेरपरीक्षा
या परीक्षेसाठी गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांचे कारण वैध असेल, तरच त्यांची फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी ऑनलाईन परीक्षेबाबत एकही तक्रार आली नाही. अंतिम सत्र, वर्षाच्या परीक्षेच्या कामात सुमारे १२५ जण कार्यरत आहेत. त्यात परीक्षा मंडळ, आयटी सेल, ऑनलाईन परीक्षा घेणारी एजन्सी, आदींचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे परीक्षा मंडळाचे प्रभारी संचालक जी. आर. पळसे यांनी सांगितले.
आकडेवारी दृष्टिक्षेपात
- ऑनलाईन परीक्षार्थी : १६९०
- ऑफलाईन परीक्षार्थी : ८४
- एकूण गैरहजर परीक्षार्थी : २८