शिवाजी विद्यापीठाच्या निधीवर बोजा; हंगामी शिक्षकांच्या पगारावर ३३ कोटी खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2021 01:43 PM2021-12-16T13:43:26+5:302021-12-16T13:44:14+5:30
रिक्त पदांच्या भरतीला शासनाची मान्यता नसल्याने आणि या शिक्षकांची विद्यापीठ भरती तासिका तत्वानुसार (सीएचबी) करीत नसल्याने स्वनिधीतून विद्यापीठाला खर्च करावा लागत आहे.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाने गेल्या पाच वर्षामध्ये हंगामी (११ महिन्यांसाठी) तत्वावरील एकूण ११८ शिक्षकांच्या पगारावर ३३ कोटी ६० लाख रुपये इतका खर्च केला आहे. रिक्त पदांच्या भरतीला शासनाची मान्यता नसल्याने आणि या शिक्षकांची विद्यापीठ भरती तासिका तत्वानुसार (सीएचबी) करीत नसल्याने स्वनिधीतून विद्यापीठाला खर्च करावा लागत आहे.
विविध अधिविभागांसाठी शासनाकडून शिक्षकांची २५२ पदे मंजूर आहेत. त्यांपैकी १५३ पदे पूर्णवेळ कार्यरत असून उर्वरित ९९ रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन विद्यापीठाच्या संशोधन वाढीस खीळ बसत आहे. अनुदानित विभागांतील रिक्त पदांवर विद्यापीठाने २८ आणि स्वयंअर्थसाहाय्यित विभागातील रिक्त पदांवर ९० शिक्षकांची हंगामी भरती केली आहे. त्यांना दरमहा ३२ हजार रुपये पगार दिला जातो.
त्यातील अनुदानित विभागातील हंगामी शिक्षकांच्या पगारावर वर्षाला एक कोटी रुपये, तर स्वयंअर्थसाहाय्यित विभागांतील शिक्षकांवर साडेपाच कोटी रुपये खर्च होत आहेत. प्रत्येक अनुदानित आणि हंगामी शिक्षक विद्यापीठामध्ये कार्यरत असूनही सुमारे १०० शिक्षकपदांचा कार्यभार शिल्लक आहे. या पदांचा कार्यभार शासनाच्या सीएचबी धोरणानुसार विद्यापीठाने दोनशेहून अधिक शिक्षकांची नेमणूक करावी. त्यामुळे विद्यापीठाचा शैक्षणिक, आर्थिक भार कमी होण्यास निश्चितपणे मदत होईल.
शिक्षकांच्या पदांची आकडेवारी
अनुदानित विभाग : ३५
शासनमान्य पदे : २५२
पूर्णवेळ कार्यरत : १२५
रिक्त : १२७
हंगामी : २८
स्वयंअर्थसाहाय्यित विभाग : २१
पूर्णवेळ कार्यरत : २८
रिक्त : १२०
हंगामी : ९०
हंगामी भरती का?
विद्यापीठातील शिक्षक सेवानिवृत्त झाल्यानंतर रिक्त होणाऱ्या पदाच्या भरतीला शासनाची मान्यता मिळत नाही. अधिविभागातून शिक्षण देण्याची गरज असल्याने विद्यापीठ हंगामी तत्त्वावर शिक्षकांची भरती विद्यापीठ प्रशासनाकडून केली जाते.
अनुदानित शिक्षकांचा शिल्लक कार्यभार शासनमान्य सीएचबी धोरणानुसार भरून विद्यापीठ फंडावरील आर्थिक बोजा कमी होण्यास निश्चित हातभार लागेल. विद्यापीठाचे बचत झालेले पैसे संशोधन, नवोपक्रम, आदींसाठी वापरावेत. - डॉ. एस. डी. डेळेकर
मुंबई, औरंगाबाद, आदी विद्यापीठांमध्ये सीएचबी धोरणानुसार शिक्षकांच्या जागा भरून वेळेचा आणि पैशांचा सदुपयोग केला जातो. त्या पद्धतीचा उपयोग शिवाजी विद्यापीठाने करणे गरजेचे आहे. विद्यापीठाला नवसंशोधन करताना निधीची कमतरता भासते. भविष्यात जागतिक स्तरावर नेत्रदीपक कामगिरी करायची असेल तर विद्यापीठाला अनावश्यक खर्चाची बचत करावी लागेल. - प्रा. मधुकर पाटील