शिवाजी विद्यापीठात उद्या संशोधनाचा ‘अन्वेषण’
By admin | Published: December 29, 2015 12:24 AM2015-12-29T00:24:43+5:302015-12-29T00:24:43+5:30
पाच प्रकारांत होणार स्पर्धा : विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला प्रोत्साहन
कोल्हापूर : विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला प्रोत्साहन देण्याकरिता भारतीय विश्वविद्यालय संघ, नवी दिल्ली (ए.आय.यू.) यांच्यातर्फे उद्या, बुधवारी शिवाजी विद्यापीठात ‘अन्वेषण’ विद्यार्थी संशोधन महोत्सव होणार आहे. विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभागात सकाळी दहा वाजता महोत्सवाचा प्रारंभ होईल.विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीस चालना देऊन समाजाच्या प्रश्नांवर उपाय शोधले जावेत, असा स्पर्धेचा उद्देश आहे. विद्यापीठ स्तर, विभागीय स्तर व राष्ट्रीय स्तर अशा तीन टप्प्यांत ही स्पर्धा घेतली जाणार असून, विद्यापीठ स्तरावरील प्राथमिक स्पर्धा उद्या होणार आहे. या स्पर्धेत शिवाजी विद्यापीठ परीक्षेत्रातील महाविद्यालयांतील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी सहभागी होतील. वर्किंग मॉडेल, लाईव्ह डेमोन्स्ट्रेशन, पोस्टरच्या साहाय्याने विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या संशोधन प्रकल्पांचे वैज्ञानिक विचार, नवकल्पकता, कौशल्य, आदी मुद्द्यांवर मूल्यांकन करण्यात येईल. प्रत्येक गटातील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास बिकानेर येथे १२ जानेवारी २०१६ रोजी होणाऱ्या विभागीय स्तरावरील संशोधन स्पर्धेत सहभागी होता येईल, अशी माहिती समन्वयक डॉ. ए. एम. गुरव आणि तंत्रज्ञान अधिविभागाचे प्रभारी संचालक डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी दिली. (प्रतिनिधी)
मुख्य पाच
प्रकारांत स्पर्धा
कृषी, मूलभूत विज्ञान, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, आरोग्य विज्ञान, फार्मसी, तसेच सामाजिक शास्त्रे, मानव्यविद्या, वाणिज्य व कायदा अशा मुख्य पाच प्रकारांत स्पर्धा होईल.