अव्वल मानांकनाच्या देशातील सात संस्थांमध्ये शिवाजी विद्यापीठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:26 AM2021-04-01T04:26:15+5:302021-04-01T04:26:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : गुणवत्तेच्या बळावर शिवाजी विद्यापीठाने राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेचे (नॅक) ‘ए-प्लस प्लस’ असे सर्वोच्च मानांकन मिळविले. ...
लोकमत न्यूज नेटवर्क,
कोल्हापूर : गुणवत्तेच्या बळावर शिवाजी विद्यापीठाने राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेचे (नॅक) ‘ए-प्लस प्लस’ असे सर्वोच्च मानांकन मिळविले. त्यासह असे अव्वल मानांकन असलेली देशातील सात विद्यापीठे, शैक्षणिक संस्थांच्या यादीत स्थान मिळविणारे राज्यातील पहिले अकृषी विद्यापीठ होण्याचा बहुमान पटकाविला आहे. त्याद्वारे गुणवत्ता सिध्द करण्यासह कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्याचा लौकिक वाढविला आहे.
विविध अभ्यासक्रम, संशोधन, प्रशासकीय व्यवस्था, नवतंत्रज्ञानाचा वापर याद्वारे विद्यापीठाने स्थापनेपासून वाटचाल सुरू ठेवली. सन २००४ मध्ये तत्कालीन कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ पहिल्यांदा नॅक मूल्यांकनाला सामोरे गेले. त्यात ‘बी प्लस’ मानांकन मिळाले. त्यानंतर मूल्यांकनाच्या दुसऱ्या फेरीत सन २००९ मध्ये मानांकन घसरून ‘बी’वर आले. तिसऱ्या फेरीची जोमाने तयारी करून सन २०१४ मध्ये विद्यापीठाने ‘ए’ मानांकनाची कमाई करून, उच्च शिक्षणातील गुणवत्तेचा केंद्रबिंदू कोल्हापूरकडे आणला. आता चौथ्या फेरीत ‘ए-प्लस प्लस’ मानांकन मिळवून राज्यात अव्वल स्थान पटकाविले आहे.
‘नॅक’ने गेल्या तीन वर्षांपासून नव्या निकषानुसार मानांकन सुरू केले. त्यात अभ्यासक्रम, अध्ययन-अध्यापन प्रणाली, संशोधन, नवनिर्मिती व विस्तार, पायाभूत सुविधा व अध्ययन स्रोत, विद्यार्थी साहाय्यता व प्रगती, प्रशासन, नेतृत्व व व्यवस्थापन आणि संस्थात्मक मूल्ये, उत्तम व वेगळे उपक्रम या निकषांद्वारे आतापर्यंत देशातील एकूण ९४ विद्यापीठांचे, शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन केले आहे.
चौकट
‘ए-प्लस प्लस’ मिळविणाऱ्या अन्य संस्था...
मदुराई कामराज विद्यापीठ, एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (तामिळनाडू), बनस्थळी विद्यापीठ (राजस्थान), रामकृष्ण मिशन विवेकानंद एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (पश्चिम बंगाल), कोनेरू लक्ष्ममयाह एज्युकेशनल फौंडेशन (आंध्र प्रदेश), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (कर्नाटक).
चौकट
शिलेदारांसह विविध घटक राबले
या मूल्यांकनासाठी डॉ. आर. के. कामत, एम. एस. देशमुख, वैभव ढेरे, अभिजित रेडेकर, धैर्यशील यादव, एम. जे. पाटील, दीपक चव्हाण आदी शिलेदारांसह प्राध्यापक, कर्मचारी या विविध घटकांचे हात राबले. या घटकांचे टीमवर्क आणि योगदानामुळे चांगले मानांकन मिळाल्याचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी सांगितले. विद्यापीठामधील एकजुटीने काम करण्याच्या प्रवृत्तीचे नॅक समितीने कौतुक केल्याचे त्यांनी सांगितले.