नॅक मूल्यांकनासाठी शिवाजी विद्यापीठ सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:23 AM2021-03-14T04:23:23+5:302021-03-14T04:23:23+5:30
कोल्हापूर : नॅकच्या मूल्यांकनासाठी शिवाजी विद्यापीठाची पूर्ण तयारी झाली आहे. उद्यापासून तीन दिवस ही प्रक्रिया चालणार ...
कोल्हापूर : नॅकच्या मूल्यांकनासाठी शिवाजी विद्यापीठाची पूर्ण तयारी झाली आहे. उद्यापासून तीन दिवस ही प्रक्रिया चालणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी दिली.
ही सहा सदस्यीय मूल्यांकन समिती रविवारी कोल्हापूरमध्ये दाखल होत आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, संगणक विभागप्रमुख डॉ. आर. के. कामत, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखापाल विलास पाटील, अंतर्गत मूल्यमापन कक्ष संचालक डॉ. एन. एस. देशमुख यावेळी उपस्थित होते.
डॉ. शिर्के म्हणाले १० डिसेंबर २०१९ रोजी आधीच्या मूल्यांकनाला पाच वर्षे पूर्ण झाली; परंतु कोरोनामुळे हे मूल्यांकन लांबले. मात्र, १००० पैकी आधीच ७०० गुणांसाठी विद्यापीठाची आवश्यक सर्व माहिती ऑनलाइन पाठवण्यात आली आहे. उर्वरित ३०० गुणांसाठी आता हे प्रत्यक्ष मूल्यांकन होणार आहे. मोहनलाल सुखाडिया विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. जे. पी. शर्मा राजस्थान, सदस्य सचिव डॉ. बी. आर. कौशल बेंगलोर, डॉ. एसएएच मुनोद्दीन पश्चिम बंगाल, डॉ. तरुण अरोरा भटिंडा, पंजाब, डॉ. सुनीलकुमार दिल्ली, डॉ. हरीश चंद्रादास मेघालय यांची सहा सदस्यीय समिती हे मूल्यांकन करणार आहे.
विद्यापीठाचे विविध अभ्यासक्रम, अध्यापन, अध्ययन, मूल्यमापन, संशोधन, विस्तार, मूलभूत सुविधा, प्रयोगशाळा, ग्रंथालय, प्रशासन, विविध नावीन्यपूर्ण उपक्रम, विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या भौतिक सुविधा अशा एकूण ३८ मुद्द्यांच्या आधारे हे मूल्यांकन करण्यात येणार आहे. पहिल्याच दिवशी सुरुवातीला कुलगुरू विद्यापीठाच्या एकूण कामकाजाबाबत सादरीकरण करतील. २४ पैकी निम्म्या अधिविभागांना समिती भेट देणार आहे.
अभ्यासक्रमांची पुनर्रचना, कमवा व शिका योजना, पर्यावरणपूरक विकास, पाच वर्षांमध्ये प्राध्यापकांनी मिळवलेले २१ पेटंटस्, ६० लाख रुपयांची दिली जाणारी विभागनिहाय शिष्यवृत्ती, चप्पल, गूळ, आरोग्य, कृषी अशा विविध समाजोपयोगी संशोधन या सगळ्याच्या जोरावर शिवाजी विद्यापीठ या मूल्यांकनामध्ये चांगली चमक दाखवेल असा विश्वास यावेळी डॉ. शिर्के यांनी व्यक्त केला.
चौकट
१०० पशू-पक्ष्यांचे फोटो झळकणार
शिवाजी विद्यापीठ हे आता ऑक्सिजन पार्क म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या परिसरात आढळणाऱ्या १०० पशू-पक्ष्यांची छायाचित्रे आता विद्यापीठ परिसरात लावण्यात येणार आहेत. या ठिकाणी असणारे पशू-पक्षी वैभव आता छायाचित्रांच्या माध्यमातून समोर येणार आहे.