शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकाने शोधल्या पालींच्या दोन नव्या प्रजाती
By संदीप आडनाईक | Published: May 16, 2023 07:37 PM2023-05-16T19:37:27+5:302023-05-16T19:38:20+5:30
अक्षय खांडेकर यांच्यासह ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या ईशान अगरवाल आणि तेजस ठाकरे या संशोधकांना यश आले आहे.
कोल्हापूर : भारताच्या दक्षिण-पूर्व तटीय सदाहरीत वनांमधून गेक्कोऐला उपपोटजातीतील दोन नविन पालींचा शोध लावण्यात शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागाचे संशोधक अक्षय खांडेकर यांच्यासह ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या ईशान अगरवाल आणि तेजस ठाकरे या संशोधकांना यश आले आहे.
बोटांच्या वैशिष्ट्यपूर्ण वक्राकार आकारांमुळे या दोन्ही पाली सर्टोडॅक्टिलस या पोटजातीत मोडतात. अंगावरील वैशिष्ट्यपूर्ण रंग, सरासरी छोटा आकार आणि मांडीवरील ग्रंथींचा अभाव यांमुळे या पालींचा समावेश गेक्कोऐला या उपपोटजातीत केला आहे. सर्टोडॅक्टिलस ईरुलाओरम या प्रजातीचा शोध तामिळनाडूच्या कांचीपुरम आणि तिरुवल्लूर या जिल्ह्यांमधून लागला आहे. ईरुला या अदिवासी द्रविडी जमातीवरुन या पालीचे नामकरण ईरुलाओरम केलेले आहे.
सर्टोडॅक्टिलस रेलिक्टस या प्रजातीचा शोध आंध्र प्रदेशामधील तिरुपती आणि नेल्लोर या दोन जिल्ह्यांमधून लागला आहे. सीमित अनुकूल भूप्रदेशात तगून राहण्यावरुन त्यांचं नामकरण रेलिक्टस या लॅटीन शब्दाने केलेले आहे. अंगावरील रंग आणि आकारांवरुन या दोन्ही पाली एकमेकांपासून आणि उपपोटजातीतील इतरांपासून वेगळ्या आहेत.
गेक्कोईला या पालींचे वैशिष्ट्ये
जमीनीवर वावरताना समतोल साधण्यासाठी वक्राकार बोटे, आकर्षक रंग-योजन हे गेक्कोईला या पालींचे वैशिष्ट्ये आहे. या पाली उष्णकटिबंधीय सदाहरीत वनांमधे सापडतात. पाला-पाचाळ्यांनी व्यापलेल्या जमीनीवर भक्ष्य पकडण्यासाठी या पाली रात्री बाहेर पडतात.
'भारतातील संशोधनाचा कल हा नेहमीच पश्चिम घाटाकडे कललेला आहे. दक्षिण-पूर्व भारतातील पर्वतांवरुन गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं नवीन प्रजाती सापडत आहेत. नव्यानं सापडलेल्या दोन प्रजातींमुळे दक्षिण भारतातील उष्णकटीबंधीय सदाहरीत वनांचे जैवविविधतेच्या दृष्टीने असणारे महत्त्व अधोरेखित होत आहे'
अक्षय खांडेकर,
पीएचडी विद्यार्थी, प्राणिशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ.