शिवाजी विद्यापीठ सिनेट सभा : प्रशासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 01:43 PM2019-12-13T13:43:28+5:302019-12-13T13:50:10+5:30
परीक्षा विभागाच्या कामकाजाची श्वेतपत्रिका काढावी, पेपर फुटीच्या प्रकरणांची चौकशी समिती नेमावी असा स्थगन प्रस्ताव शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीने अधिसभेत शुक्रवारी मांडला.
कोल्हापूर : परीक्षा विभागाच्या कामकाजाची श्वेतपत्रिका काढावी, पेपर फुटीच्या प्रकरणांची चौकशी समिती नेमावी असा स्थगन प्रस्ताव शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीने अधिसभेत शुक्रवारी मांडला.
हा प्रस्ताव सभेच्या अध्यक्षस्थानी असलेल्या कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी नाकारला. त्याच्या निषेधार्थ विद्यापीठ विकास आघाडीच्या सदस्यांनी सभात्याग केला. सभागृहाबाहेर विद्यापीठ प्रशासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.
शिवाजी विद्यापीठाची अधिसभा (सिनेट) आज, सुरु झाली . विद्यापीठाचा नामविस्तार, लेखापरीक्षणाबाबतचा अहवाल, ‘बीएलओ’ म्हणून कर्मचाऱ्यांची होणारी नियुक्ती, आदी मुद्यांवरून वादळी चर्चा आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पीएच. डी. अभ्यासक्रम करण्यासाठी सवलत, खेळाडूंप्रमाणे कला, सांस्कृतिक स्पर्धांमधील विजेत्यांना सवलतीचे गुण देणे, आदी ठरावांवर चर्चा होणार आहे. विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहात दुपारी १२ वाजता अधिसभेची सुरुवात झाली.
यापूर्वी मे महिन्यात अधिसभा झाली होती. त्यामध्ये संलग्न महाविद्यालय, मान्यताप्राप्त परिसंस्थांच्या तपासणीसाठीच्या समितीवरील सदस्यांची नियुक्ती आणि प्रशासनाने स्वीकारलेल्या प्रश्नांच्या मुद्द्यांवरून अधिसभेत ‘सुटा’ आणि ‘विकास आघाडी’च्या सदस्यांमध्ये खडाजंगी झाली होती.
कळे महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया, ‘बीएलओ’ म्हणून कर्मचाऱ्यांना पाठविणे, डाटा मायग्रेशन, संगणक प्रणालींवरील खर्च, आदी मुद्यांवरून अधिसभेमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.