शिवाजी विद्यापीठ अधिसभा सदस्यांकडून राज्यपालांचा निषेध, स्थगन प्रस्ताव नाकारल्याने केला सभात्याग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 01:01 PM2022-03-11T13:01:14+5:302022-03-11T13:01:47+5:30
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास सांगत असल्याचा आरोप करत शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीच्या अधिसभा सदस्यांनी आज, शुक्रवारी अधिसभेच्या प्रारंभी निषेध नोंदविला.
कोल्हापूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास सांगत असल्याचा आरोप करत शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीच्या अधिसभा सदस्यांनी आज, शुक्रवारी अधिसभेच्या प्रारंभी निषेध नोंदविला. विद्यापीठ प्रशासनाने राज्यपालांच्या निषेधाचा स्थगन प्रस्ताव नाकारल्याने सदस्यांनी सभात्याग केला.
तर, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापकाबाबत दिलेला निर्णय अंमलबजावणीबाबतचा स्थगन प्रस्ताव नाकारले विद्यापीठ शिक्षक संघाच्या (सुटा) सदस्यांनीही सभात्याग केला. विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहाबाहेर येवून विद्यापीठ प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.
अधिसभा सुरू होण्यापूर्वी विकास आघाडीच्या सदस्यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर एकत्रित येवून राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध केला. यावेळी अधिसभा सदस्य मधुकर पाटील यांनी छत्रपती शिवरायांचा इतिहास राज्यपाल कोश्यारी चुकीचा सांगत असल्याने आम्ही त्यांचा निषेध केला असल्याचे सांगितले. त्यानंतर उपस्थित सदस्यांनी राज्यपालांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी धैर्यशील पाटील, संजय जाधव, डी. आर. मोरे, भारती पाटील, आदी उपस्थित होते.
यानंतर सभागृहात आल्यानंतर प्रताप पाटील, मधुकर पाटील, अमरसिंह रजपूत यांनी राज्यपालांच्या निषेधाचा स्थगन प्रस्ताव मांडला. प्रशासनाने तो नाकारल्याने विकास आघाडीच्या सदस्यांनी सभात्याग केला. दरम्यान, सुटा पुरस्कृत अधिसभा सदस्य डॉ. निळकंठ खंदारे यांनी मांडलेला राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या निर्णयाबाबतचा स्थगन प्रस्तावही प्रशासनाने नाकारला. त्यावर डॉ. खंदारे यांच्यासमवेत ए.बी. पाटील, अरूण पाटील, इला जोगी, मनोज गुजर, अलका निकम या सदस्यांनी सभात्याग केला. त्यांनी प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. त्यानंतर अधिसभेत दुपारी बाराच्या सुमारास प्रश्नोत्तराचा तास सुरू झाला.