शिवाजी विद्यापीठाने पदवीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घ्याव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:46 AM2021-03-04T04:46:46+5:302021-03-04T04:46:46+5:30
कोरोनामुळे गेल्यावर्षी विद्यापीठाने वस्तुनिष्ठ प्रश्नांद्वारे परीक्षा घेतली. यावेळी काही विद्यार्थ्यांनी दुसऱ्या मोबाईलवर गुगलवर पाहून उत्तरे लिहिली. गणित, अकौंटन्सी, कॉस्टिंग ...
कोरोनामुळे गेल्यावर्षी विद्यापीठाने वस्तुनिष्ठ प्रश्नांद्वारे परीक्षा घेतली. यावेळी काही विद्यार्थ्यांनी दुसऱ्या मोबाईलवर गुगलवर पाहून उत्तरे लिहिली. गणित, अकौंटन्सी, कॉस्टिंग हे प्रात्यक्षिकांवर आधारित विषय आहेत. त्यांची तयारी भविष्यासाठी महत्त्वाची असते. वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या माध्यमातून संबंधित तयारी होणार नाही. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा झाल्यास खऱ्या अर्थाने परीक्षा होणार नाहीत. पर्यायाने भविष्यातील आव्हानाना विद्यार्थी तोंड देऊ शकणार नाहीत. त्यामुळे ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात याव्यात, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. त्यावर राज्यातील अन्य विद्यापीठांनी राबविलेली परीक्षा पद्धत शक्यतो अवलंबली जाते. या फोरमने केलेली मागणी, सुचविलेले पर्यायांची माहिती विद्यापीठ परीक्षा नियोजन समितीसमोर ठेवून योग्य निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही कुलगुरू डॉ. शिर्के यांनी दिली. यावेळी फोरमचे राज्य समन्वयक प्रताप गस्ते, विशेष सल्लागार संजय कुलकर्णी, सल्लागार भीमराव धुळुबुळु, गणेश जोशी, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य संजय जाधव उपस्थित होते.
चौकट
फोरमने मांडलेले मुद्दे
एका विषयाच्या दोन किंवा तीन वेगळ्या प्रश्नपत्रिका काढून वेगवेगळ्या सत्रात कोरोनाचे नियम पाळून ऑफलाईन परीक्षा घेता येईल, असे भीमराव धुळुबुळु यांनी सुचविले. ऑनलाईन परीक्षेमुळे वर्षभर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होईल, असे गणेश जोशी यांनी सांगितले. पदवीची परीक्षा हा गंभीर विषय असून, औपचारिकता म्हणून ती उरकून घेणे धोक्याचे असल्याचे संजय कुलकर्णी यांनी सांगितले. एमसीक्यूने विद्यार्थ्यांची फसवणूक होईल, असे मत प्रताप गस्ते यांनी व्यक्त केले.
फोटो (०३०३२०२१-कोल-विद्यापीठ निवेदन) : शिवाजी विद्यापीठात बुधवारी ऑफलाईन परीक्षेबाबतचे निवेदन सांगलीतील कोचिंग क्लासेस टिचर्स असोसिएशन अँड सोशल फोरमच्या शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांना दिले.