शिवाजी विद्यापीठ ‘नॅक’ मानांकनात राज्यात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:26 AM2021-04-01T04:26:10+5:302021-04-01T04:26:10+5:30
कोल्हापूर : संशोधनातील कामगिरी, विद्यार्थीभिमुख आणि नावीन्यपूर्ण उपक्रम, आदी स्वरूपातील दर्जेदार, उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर शिवाजी विद्यापीठाला राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेकडून ...
कोल्हापूर : संशोधनातील कामगिरी, विद्यार्थीभिमुख आणि नावीन्यपूर्ण उपक्रम, आदी स्वरूपातील दर्जेदार, उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर शिवाजी विद्यापीठाला राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेकडून (नॅक) ३.५२ गुणांसह (सीजेपीए) ‘ए-प्लस प्लस’ मानांकन बुधवारी मिळाले. ‘नॅक‘च्या नव्या प्रक्रियेतील हे मानांकन राज्यामध्ये सर्वोच्च ठरले असून, त्याव्दारे विद्यापीठाने गुणवत्तेचा ठसा अधिक ठळकपणे राज्यासह राष्ट्रीय पातळीवर उमटविला आहे.
विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांच्यासह विद्यापीठाच्या सर्व घटकांच्या योगदानाचा या मानांकनाच्या यशामध्ये महत्त्वाचा वाटा आहे. या यशाने आम्हा सर्वांची जबाबदारी वाढली असून, यापुढे हे मानांकन वाढविण्यासाठी आम्ही सर्वजण कार्यरत राहणार असल्याची प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी व्यक्त केली. विद्यापीठाने २०१४ मध्ये ‘अ’ मानांकन मिळवून पुणे, मुंबईकडील गुणवत्तेच्या केंद्रबिंदूचा कोल्हापूरपर्यंत विस्तार केला. आता या मानांकनामध्ये वाढ करून शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. मोहनलाल सुखाडिया विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. जे. पी. शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्य समितीने दि. १५ ते १७ मार्च या कालावधीत शिवाजी विद्यापीठाला भेट देऊन मूल्यांकन केले. या समितीने पाहणीचा अहवाल बेंगलोर येथील नॅकला सादर केला होता. त्यानंतर पुढील प्रक्रिया होऊन नॅकने मंगळवारी दुपारी पावणेएक वाजता विद्यापीठाचे मूल्यांकन जाहीर केले. त्यात विद्यापीठाला ३.५२ सीजीपीएससह ‘ए-प्लस प्लस’ असे मूल्यांकन मिळाले आहे. बदललेली प्रक्रिया, निकषांनुसार विद्यापीठ या मूल्यांकनाला सामोरे गेले. कोरोनामुळे एक वर्ष उशिरा मूल्यांकन झाले. आम्ही सर्वांनी एकजुटीने, सूक्ष्मनियोजन करून तयारी केली. त्यामुळे नवी प्रक्रिया असूनही विद्यापीठाला राज्यात सर्वोच्च मानांकन मिळाले आहे. त्यात अभ्यासक्रम, विद्यार्थी सुविधा, अध्ययन-अध्यापन, चांगले उपक्रम या निकषांमध्ये चांगले गुण मिळाले आहेत. हे यश विद्यापीठातील सर्व घटकांची ऊर्जा वाढविणारी आहे. ‘एनआयआरएफ’मधील रँकिंग वाढविणे यापुढील आमचे ध्येय असल्याचे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर. के. कामत, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. एम. एस. देशमुख उपस्थित होते.