शिवाजी विद्यापीठ देणार आता आरोग्यवर्धक हळदीची गोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 05:17 PM2019-11-07T17:17:53+5:302019-11-07T17:20:31+5:30
जेवण स्वादिष्ट बनविणारी हळद ही औषधी आणि आरोग्यासाठीदेखील लाभदायक ठरणारी आहे. ते लक्षात घेऊन शिवाजी विद्यापीठातील वनस्पतिशास्त्र विभागाने आरोग्यवर्धक, कुरकुमीनयुक्त, चघळता येणाºया हळदीच्या गोळीची (च्युएबल टॅबलेट्स) निर्मिती केली आहे; त्यासाठी या विभागातील संशोधक आणि इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग सेंटर इन बॉटनीचे समन्वयक डॉ. मानसिंगराज निंबाळकर यांनी वर्षभर संशोधन केले आहे.
संतोष मिठारी
कोल्हापूर : जेवण स्वादिष्ट बनविणारी हळद ही औषधी आणि आरोग्यासाठीदेखील लाभदायक ठरणारी आहे. ते लक्षात घेऊन शिवाजी विद्यापीठातील वनस्पतिशास्त्र विभागाने आरोग्यवर्धक, कुरकुमीनयुक्त, चघळता येणाऱ्या हळदीच्या गोळीची (च्युएबल टॅबलेट्स) निर्मिती केली आहे; त्यासाठी या विभागातील संशोधक आणि इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग सेंटर इन बॉटनीचे समन्वयक डॉ. मानसिंगराज निंबाळकर यांनी वर्षभर संशोधन केले आहे.
विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सांगली, कोल्हापूर, कऱ्हाड आणि शेजारील कोकणामध्ये हळदीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. ते घेणाऱ्या शेतकऱ्यांना काही अधिकचे उत्पन्न मिळावे, या उद्देशाने वनस्पतिशास्त्र विभागात हळदीच्या विविध जातींवर संशोधन करण्यात येत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने निरोगी रोपांसाठी ऊतीसंवर्धन, कुरकुमीन या घटकाला वेगळे करण्याच्या पद्धती, औषधी उपयोग, आदी प्रयोगांचा समावेश आहे.
त्याअंतर्गत विद्यापीठाच्या इनक्युबेशन अॅँड ट्रेनिंग सेंटर इन बॉटनी आणि रुसा सेंटर फॉर नॅचरल प्रॉडक्टस अॅँड अल्टरनेटिव्ह मेडिसिन या विभागांनी संयुक्त संशोधन केले. त्यातून हळदीच्या चघळता येणाºया गोळीची निर्मिती झाली.
जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केलेल्या प्रतिदिन मात्रा विचारात घेऊन या गोळीची पान, मिंट, जिंजर अशा फ्लेव्हरमध्ये निर्मिती केली आहे. फ्लेव्हर्समध्ये निर्मिती करताना त्याला शास्त्रीय आधार देऊन औषधी गुणधर्म कायम राहतील, याची दक्षता संशोधकांनी घेतली आहे. या संशोधनाच्या माध्यमातून विद्यापीठ आता समाजाला आरोग्यवर्धक हळदीची गोळी उपलब्ध करून देणार आहे.
‘कुरकुमीन’ कायम ठेवून निर्मिती
हळदीतील औषधी महत्त्व असणारा कुरकुमीन हा घटक पाण्यात न विरघळणारा आहे. शिवाय सहजासहजी शरीरात शोषला जात नाही; त्यामुळे त्याचे फायदे मिळवायचे झाल्यास त्याला इतर घटकांसोबत घेणे आवश्यक असते; त्यामुळे आपल्याकडे पूर्वीपासून हळद ही दूध, तेल अथवा तुपासोबत घेतली जाते.
बाजारात उपलब्ध असणाऱ्या हळदीच्या बहुतेक गोळ्यांमध्ये ‘कुरकुमीन’ हा घटक वेगळा काढून त्यापासून गोळ्या बनविल्या जातात; मात्र आम्ही कुरकुमीन वेगळे न काढता या गोळ्यांची निर्मिती केली असल्याचे डॉ. निंबाळकर यांनी सांगितले.
‘स्टार्टअप’द्वारे बाजारात आणणार
इनक्युबेशन सेंटरद्वारे या गोळ्या स्टार्टअपच्या माध्यमातून विद्यापीठ बाजारात आणणार आहे. या संशोधनाचे पेटंट घेतले जाणार आहे. या संशोधनासाठी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेजेसचे संचालक डॉ. आर. के. कामत यांचे मार्गदर्शन लाभले, असे डॉ. निंबाळकर यांनी सांगितले.