शिवाजी विद्यापीठ करणार तमिळ विद्यापीठासोबत सामंजस्य करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 11:48 PM2019-03-31T23:48:39+5:302019-03-31T23:48:43+5:30
संदीप आडनाईक । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे भोसले यांच्यामुळे कर्नाटक आणि तमिळनाडू ...
संदीप आडनाईक ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे भोसले यांच्यामुळे कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांत जतन झालेल्या मराठी संस्कृतीचा अहद् तंजावर, तहद् पेशावरचा इतिहास उजेडात येण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. या संदर्भात शिवाजी विद्यापीठ आणि तमिळ विद्यापीठामध्ये एप्रिलमध्ये सामंजस्य करार होणार आहे. त्यामुळे इतिहास संशोधकांना दोन्ही प्रदेशांबरोबरच त्यांच्या सावत्र नात्यावरही आणखी प्रकाश पडणार असून, संशोेधनाचे नवे द्वार उघडणार आहे.
चार वर्र्षांपूर्वी राज्य मराठी संस्कृती मंडळाच्या अनुदानातून तंजावरच्या ऐतिहासिक दस्तऐवजाच्या जतनीकरणाचा प्रकल्प सुरू झाला. या प्रकल्पावर कोल्हापूरचे मोडीतज्ज्ञ गणेश नेर्लेकर-देसाई यांच्यासह महाराष्ट्रातील काही मान्यवर काम करीत होते. यावेळी मंडळामार्फत सात लाख दुर्मीळ मोडी कागदपत्रांचे डिजिटायजेशन करण्यात आले. यानिमित्ताने तमिळ विद्यापीठासोबत सामंजस्य करार करता येईल, असा विचार सुरू झाला. त्याला तमिळ विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठाने अनुकूलता दर्शविली. त्याला आॅगस्ट २०१९ मध्ये मूर्त स्वरूप प्राप्त झाले.
यासाठी स्थापन केलेल्या समितीवर राज्य मराठी विकास मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. आनंद काटीकर, सहायक संचालक डॉ. अशोक सोलणकर, तज्ज्ञ समिती सदस्य गणेश नेर्लेकर-देसाई, इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या पुरातत्त्व विभागाचे प्रा. डॉ. गिरीश मांडके, मुंबईचे मोडीतज्ज्ञ श्रीकृष्णाजी म्हात्रे यांची निवड करण्यात आली होती.
सामंजस्य करारासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. अवनीश पाटील, गणेश नेर्लेकर, डॉ. नीलांबरी जगताप, तंजावरचे तमिळ विद्यापीठाचे कुलगुरू सी. बालसुब्रह्मण्यम, डॉ. विवेकानंद गोपाळ यांचा समावेश आहे.
छत्रपतींचे घराणे म्हणून तंजावरचे भोसले घराणे ओळखले जाते; तेथील ऐतिहासिक व मोडी कागदपत्रांचे जतन त्या घराण्याने केले आहे, याची फार थोड्यांना माहिती आहे. तेथील माहिती घेण्यासाठी शिवाजी विद्यापीठाची एक समिती तंजावरला पाठविली. डॉ. अवनीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली या समितीने अभ्यास करून तंजावर व कोल्हापूरचे संबंध आणखी दृढ होतील अशी कागदपत्रे तपासली आहेत. त्यातून हा सामंजस्य करार अस्तित्वात येत आहे. यानिमित्ताने दोन राज्यांतील जुने संबंध पुन्हा जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.
- डॉ. देवानंद शिंदे, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ