शिवाजी विद्यापीठात युवक-सुरक्षारक्षकांत हाणामारी-वसतिगृह परिसरातील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 05:27 PM2019-04-03T17:27:37+5:302019-04-03T17:29:40+5:30
शिवाजी विद्यापीठाच्या वसतिगृहाचा गेस्ट चार्ज अदा करण्याच्या कारणावरून युवक सचिन बनसोडेआणि सुरक्षारक्षकांमध्ये हाणामारीचा प्रकार बुधवारी सकाळी घडला. गेस्ट चार्जच्या रकमेची मागणी करीत
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या वसतिगृहाचा गेस्ट चार्ज अदा करण्याच्या कारणावरून युवक सचिन बनसोडेआणि सुरक्षारक्षकांमध्ये हाणामारीचा प्रकार बुधवारी सकाळी घडला. गेस्ट चार्जच्या रकमेची मागणी करीत चारहून अधिक सुरक्षारक्षकांनी मला मारहाण करून एका खोलीत कोंडून ठेवल्याचा आरोप बनसोडे याने केला आहे. बनसोडे हे सध्या विद्यापीठाचे विद्यार्थी नाहीत. ते गेल्या महिन्याभरापासून वसतिगृहात नियमबाह्य पद्धतीने राहत होते. त्यांना आज सुरक्षारक्षकांनी पकडले असता ते संबंधित सुरक्षारक्षकांच्या अंगावर धावून गेले, त्यातून त्यांच्यात हाणामारी घडली असावी, असे प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी सांगितले.
याबाबत बनसोडे याने सांगितले की, वसतिगृहातील रेक्टर, शिपाई यांच्या सूचनेनुसार सकाळी आठच्या सुमारास चारहून अधिक सुरक्षारक्षक माझ्या खोलीमध्ये आले. त्यांनी मला गेस्ट चार्ज न भरता येथे का राहतोस, अशी विचारणा करीत मारहाण केली. एका खोलीत कोंडून ठेवले. एक तासानंतर प्र-कुलगुरूंना भेटण्यासाठी आणले. मला झालेल्या मारहाणीची माहिती मी प्र-कुलगुरूंना दिली. त्यांनी मला कुलसचिवांना भेटण्यास सांगितले. माझी घरची परिस्थिती बेताची आहे. माझे मूळ गाव नाजरा (ता. सांगोला) आहे. मी विद्यापीठातून बीजेसी, एमजेसी, एम. ए. (इंग्लिश)चे शिक्षण पूर्ण केले असून, पीएच. डी. प्रवेशासाठी पात्र ठरूनही मला अद्याप प्रवेश मिळालेला नाही.
प्रवेश मिळेल याच्या प्रतीक्षेत मी वसतिगृहात गेल्या चार महिन्यांपासून गेस्ट चार्ज भरून राहत आहे. गेल्या महिन्याचा चार्ज मला भरता आलेला नाही. माझे शैक्षणिक नुकसान होऊ नये. मला न्याय मिळावा. मला मारहाण करणाऱ्या सुरक्षारक्षकांवर कारवाई करावी. दरम्यान, प्र-कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, बनसोडे हे पहिल्यांदा अंगावर धावून गेल्याची माहिती सुरक्षारक्षकांनी दिली आहे. याबाबत आम्ही बनसोडे यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधला आहे.
शैक्षणिक नुकसान होऊ नये
दरम्यान, बनसोडे याला मारहाण झाल्याच्या प्रकाराबाबत प्र-कुलगुरू, कुलसचिव यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची आणि बनसोडे याचे शैक्षणिक नुकसान होवू नये, अशी मागणी केली असल्याचे आॅल इंडिया यूथ फेडरेशनचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गिरीश फोंडे यांनी सांगितले. बनसोडे हा पीएच. डी. प्रवेशासाठी पात्र आहे. मात्र, त्याबाबतच्या कार्यवाहीस विलंब होत असल्याने त्याला वसतिगृहात राहावे लागले. त्याच्याकडून काही नियमबाह्य झाले असेल, तर विद्यापीठ प्रशासन, सुरक्षारक्षकांनी त्याच्याकडे विचारणा करण्यास हरकत नव्हती. मात्र, त्याला सुरक्षारक्षकांनी मारहाण केल्याचा प्रकार निंदनीय आहे. या सुरक्षारक्षकांवर कारवाई करावी.
या प्रकाराची चौकशी करणार
या हाणामारीच्या प्रकाराच्या दोन्ही बाजू समजून घेणार आहे. वसतिगृहातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून पुढील कार्यवाही करणार असल्याचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी सांगितले.