शिवाजी विद्यापीठाचा ५२ वा दीक्षांत समारंभ २७ रोजी
By Admin | Published: February 19, 2016 01:08 AM2016-02-19T01:08:58+5:302016-02-19T01:09:21+5:30
जी. डी. यादव यांची उपस्थिती : प्रियांका पाटील ‘राष्ट्रपती सुवर्णपदक’; माधवी पंडित ‘कुलपती पदका’च्या मानकरी
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा ५२ वा दीक्षांत समारंभ दि. २७ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजता होणार आहे. लोककला केंद्रात होणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईतील इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजीचे कुलगुरू प्रा. डॉ. जी. डी. यादव उपस्थित राहणार आहेत.
यावर्षी शिराळा (जि. सांगली) येथील प्रियांका रामचंद्र पाटील ‘राष्ट्रपती सुवर्णपदक,’ तर साताऱ्यातील माधवी चंद्रकांत पंडित या ‘कुलपती पदका’च्या मानकरी ठरल्या आहेत. यंदा ५२ हजार १६० स्नातकांना पदवी प्रमाणपत्रे प्रदान केली जाणार आहेत, अशी माहिती कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे व परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. डॉ. शिंदे म्हणाले, दीक्षांत समारंभानिमित्त यावर्षी विविध उपक्रम आयोजित केले आहेत. त्याची सुरुवात २६ फेब्रुवारीपासून ग्रंथमहोत्सवाने होईल. यावेळी डॉ. यादव यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला जाणार आहे.
२०१४-१५ मध्ये कला, क्रीडा, बौद्धिक या क्षेत्रांसह एनसीसी, एनएसएस यातील सर्वसाधारण कौशल्यासाठीचे विद्यापीठाचे राष्ट्रपती सुवर्णपदक शिराळ्याच्या प्रियांका पाटीलला प्रदान केले जाणार आहे. प्रियांका ही विद्यापीठातील एम. ए. इंग्रजी विभागाची विद्यार्थिनी आहे. एम. ए. संस्कृत विषयात सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल साताऱ्यातील माधवी पंडित यांना ‘कुलपती पदक’ देऊन गौरविण्यात येणार आहे. पंडित या साताऱ्यातील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये संस्कृतच्या सहायक प्राध्यापिका असून, त्या याच महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत.
पत्रकार परिषदेस प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. डी. आर. मोरे, ग्रंथपाल डॉ. नमिता खोत, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
समारंभास २६ फेब्रुवारीपासून ग्रंथमहोत्सवाने प्रारंभ
दीक्षांत समारंभानिमित्त बॅ. बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयातर्फे दि. २६ ते २८ फेब्रुवारीदरम्यान ग्रंथमहोत्सव होणार असल्याचे विद्यापीठाच्या ग्रंथपाल
डॉ. नमिता खोत यांनी गुरुवारी येथे दिली.
विद्यापीठात दि. २६ रोजी सकाळी साडेनऊ वाजता कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते ग्रंथमहोत्सवाचे उद्घाटन होईल. दहा वाजता लोककला केंद्रात अंध विद्यार्थ्यांचा ‘आॅर्केस्ट्रा आयडियल स्टार्स’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होईल.
ग्रंथमहोत्सवात देश-परदेशातील विविध प्रकाशक, पुस्तक विक्रेते, डेटाबेस पॅकेज, डिजिटल ग्रंथांचे ५० स्टॉल असणार आहेत. दि. २७ फेब्रुवारीला ग्रंथदिंडी, पालखी काढण्यात येणार आहे. कमला कॉलेज येथून सकाळी साडेसात वाजता गं्रथदिडींचा प्रारंभ होईल. जनता बझार, राजारामपुरी मुख्य रस्ता, आईचा पुतळा, सायबर चौक, लोककला केंद्र असा ग्रंथदिडींचा मार्ग आहे. दि. २८ फेब्रुवारीला समारोप होईल. ग्रंथ प्रदर्शन ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेवर होईल. यंदा प्रथमच ग्रंथपालांना सहभागी केले जाणार आहे.
महाविद्यालय प्रवेशापासून राष्ट्रपती पदकाचे स्वप्न पाहिले होते. ते सत्यात उतरल्यामुळे खूप आनंद झाला आहे. एनएसएस व वक्तृत्व यातील सहभागामुळे आत्मविश्वास वाढला. यशात कुटुंबीय व शिक्षकांचे श्रेय मोठे आहे.
- प्रियांका पाटील