शिवाजी विद्यापीठाचे पाण्याबाबत स्वयंपूर्णतेचे पाऊल!
By admin | Published: May 13, 2016 12:43 AM2016-05-13T00:43:19+5:302016-05-13T00:54:07+5:30
आठ एकरांत चार शेततळी साकारणार : तलाव, विहिरींच्या पुनरुज्जीवनाचे काम सुरू
संतोष मिठारी -- कोल्हापूर -दुष्काळाची स्थिती लक्षात घेता, भविष्यात पाण्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने पाऊल टाकले आहे. यासाठी विद्यापीठाच्या परिसरातील आठ एकर जागेत चार शेततळी साकारण्यासह दोन तलाव आणि आठ विहिरींच्या स्रोतांच्या पुनरुज्जीवनाचे काम राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) आणि विद्यापीठाच्या प्रशासनाने सुरू केले आहे. शेततळ्यांद्वारे वर्षाला सुमारे दीड कोटी लिटर पाणीसाठा करण्याचे नियोजन केले आहे.
विद्यापीठ हे मुख्य इमारतीवरील रेनवॉटर हार्वेस्टिंग तसेच परिसरातील दोन तलाव आणि सुस्थितीत असलेल्या सहा विहिरींमध्ये पावसाळ्यात पाणी संकलित करते. त्याचा दरवर्षी जून ते फेब्रुवारीपर्यंत वापर करते.
विद्यापीठाला रोज सहा लाख लिटर पाणी लागते. मार्च ते मे महिन्यापर्यंत कोल्हापूर महानगरपालिकेकडून ते रोज चार लाख ६० हजार लिटर पाणी विकत घेते. गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्याने विद्यापीठातील जलसाठ्यांमधील पाण्याचे प्रमाण घटले. त्यामुळे विद्यापीठाला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन पाण्याबाबत वर्षभर स्वयंपूर्ण होण्याचा निर्धार प्रशासनाने केला. त्यानुसार विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र विभाग ते अभियांत्रिकी शेड परिसरातील आठ एकर जागेमध्ये चार शेततळी साकारण्याचे काम गेल्या चार दिवसांपासून सुरू केले आहे. ‘एनएसएस’चे स्वयंसेवक, शारीरिक शिक्षण संचालक, विद्यापीठाशी संबंधित विविध घटकांच्या श्रमदान, मदतीतून या शेततळ्यांचे काम सुरू आहे. सध्या एका शेततळ्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यासह वि. स. खांडेकर भाषाभवन आणि संगीत व नाट्यशास्त्र विभागाजवळील तलाव तसेच अन्य परिसरांतील आठ विहिरींचे नैसर्गिक स्रोत खुले करण्यासह गाळ काढण्याचे काम केले जात आहे. या स्रोतांच्या माध्यमातून विद्यापीठ पाण्याबाबत स्वयंपूर्ण होणार आहे.
उपलब्ध पाण्याचे सुनियोजन
विद्यापीठाच्या ८५३ एकर परिसरात विविध ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे. त्याचे योग्य नियोजन करण्याचा प्रयत्न प्रशासन करीत असल्याचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी सांगितले. ते म्हणाले, आठ एकर परिसरात चार शेततळी साखळी पद्धतीने साकारण्यात येत आहेत.
कमीत कमी एक ते जास्तीत जास्त पाच एकरांमध्ये शेततळे साकारण्यात येणार आहे. याद्वारे थेट जमिनीमध्ये पाणी मुरविले जाईल. शिवाय संकलित झालेले पाणी विहिरी, तलावांत वळविण्यात येईल. महानगरपालिकेकडून घेतल्या जाणाऱ्या पाण्यासाठी विद्यापीठाला दरमहा साडेपाच लाख रुपये खर्च येतो. तो वाचविला जाणार आहे. त्यासह पाणीबचतीसाठी विद्यापीठातील विविध विभागांमध्ये स्वयंचलित बंदकळ (अॅटो स्टॉप) बसविले जाणार आहेत.
परिसरात कुठेही कूपनलिका मारल्या जाणार नाहीत. त्यासह जलसाक्षरतेचा उपक्रमही राबविण्यात येणार आहे.
पाणी हे जीवन आहे; त्यामुळे त्याचा प्रत्येकाने गरजेनुसारच वापर करावा, त्याचा अपव्यय करू नये. सध्याची दुष्काळाची स्थिती लक्षात घेता, पिण्यासाठी ग्लास भरून पाणी घेण्याऐवजी तांब्या आणि फुलपात्राचा वापर करावा. पाणीबचतीसाठी तरुणाईने अधिकतर पुढाकार घ्यावा. त्यांनी स्वत: ते आचरणात आणून इतरांना पाणीबचतीचे महत्त्व पटवून द्यावे. त्या दृष्टीने विविध उपक्रम राबवावेत. दुष्काळ आहे म्हणून पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. मात्र, यापुढेही दुष्काळाची परिस्थिती येऊ नये या दृष्टीने प्रत्येकाने पाण्याचे नियोजन करावे. घरे, कार्यालयांच्या ठिकाणी रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्यात यावे. पाण्याचा एक-एक थेंब वाचवावा. ‘लोकमत’तर्फे विविध स्वरूपांतील सामाजिक बांधीलकी जोपासणारे उपक्रम राबविले जातात. याअंतर्गत ‘लोकमत’ने सध्या हाती घेतलेला ‘जलमित्र अभियान’ हा उपक्रम स्तुत्य आहे. त्यातून अत्यंत चांगल्या पद्धतीने समाजातील विविध घटकांपर्यंत जलसाक्षरता पोहोचणार आहे.
- कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, शिवाजी विद्यापीठ