शिवाजी विद्यापीठाच्या ५१० कोटींच्या ‘बजेट’ला मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:27 AM2021-02-11T04:27:20+5:302021-02-11T04:27:20+5:30
कोल्हापूर : संशोधन, शिक्षणासह विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आदींसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठीच्या यावर्षीच्या सुमारे ५१० कोटींच्या अंदाजपत्रकाला (बजेट) शिवाजी ...
कोल्हापूर : संशोधन, शिक्षणासह विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आदींसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठीच्या यावर्षीच्या सुमारे ५१० कोटींच्या अंदाजपत्रकाला (बजेट) शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने बुधवारी मान्यता दिली. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विविध अधिविभाग, संलग्नित महाविद्यालयांमधील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वर्ग सोमवार (दि. १५) पासून भरविण्यास मान्यता दिली. त्यानुसार याबाबतच्या नियमावलींचे पालन, विविध सूचना या महाविद्यालयांना आज, गुरुवारपासून विद्यापीठ प्रशासनाकडून दिल्या जाणार आहेत.
विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीस कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आदी उपस्थित होते. यावर्षीचे अंदाजपत्रक दि. १० मार्च रोजी होणाऱ्या अधिसभेत (सिनेट) सादर करण्याबाबत या बैठकीत शिफारस करण्यात आली. बांधकाम समितीच्या शिफारसी स्वीकारण्यात आल्या. राष्ट्रीय गणित दिवस, विज्ञान दिवसाचे विविध उपक्रम विद्यापीठाच्या निधीतून राबविण्यास मान्यता देण्यात आली. भगवान महावीर अध्यासनाच्या समन्वयक पदाची तात्पुरती जबाबदारी डॉ. विजय ककडे यांच्यावर सोपविण्यासह पूर्णवेळ समन्वयक नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यास मान्यता दिली. तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या नियुक्तीसाठी शासनाने मंजुरी देण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
चौकट
कॅम्पसमध्ये लागणार पक्ष्यांची छायाचित्रे
विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विविध ९० प्रकारचे पक्षी आहेत. त्यातील प्रमुख ५० पक्ष्यांची माहिती आणि त्याबाबतची छायाचित्रे कॅम्पसमध्ये ठिकठिकाणी लावण्यास व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली.