शिवाजी विद्यापीठाचे आज ‘बजेट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:24 AM2021-03-10T04:24:58+5:302021-03-10T04:24:58+5:30
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाची अधिसभा (सिनेट) आज, बुधवारी दुपारी बारा वाजता विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहामध्ये होणार आहे. त्यात ...
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाची अधिसभा (सिनेट) आज, बुधवारी दुपारी बारा वाजता विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहामध्ये होणार आहे. त्यात सन २०२१-२२ या आर्थिक वर्षांमधील सुमारे ५१० कोटींच्या अंदाजपत्रकाचे (बजेट) सादरीकरण होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे बजेट सादर होणार असल्याने त्याकडे विद्यापीठाच्या घटकांचे लक्ष लागले आहे.
गेल्यावर्षी विद्यापीठाने ४५५ कोटी ९० लाख रुपयांचे अंदाजपत्रक अधिसभेने मंजूर केले होते. या अंदाजपत्रकातील ९ कोटी ९६ लाख रुपये इतकी तूट ही विद्यापीठ निधीतील शिलकीतून भरून काढली होती. पेटंटसाठीचा खर्च, दिव्यांग विद्यार्थ्यांना मदत आदींसाठी त्यामधून तरतूद करण्यात आली होती.
डॉ. डी. टी. शिर्के हे त्यांच्या कुलगुरू पदाच्या कारकीर्दीतील पहिले बजेट बुधवारी अधिसभेसमोर सादर करणार आहेत. सुमारे ५१० कोटींचे हे बजेट असणार आहे. दरम्यान, अधिसभेतील प्रश्नोत्तराचा तास झाल्यानंतर बजेट सादरीकरण होईल. त्यातील मुद्द्यांबरोबरच पेपरफुटी प्रकरण, ठरावांची अंमलबजावणी, किती महाविद्यालयांना बी. व्होक. पदवी अभ्यासक्रमांना मिळालेली मान्यता, गेल्या पाच वर्षांत सादर झालेले एम. फिल्.. पीएच.डी.चे प्रबंध, अधिसंख्य पदांचा मुद्दा, कोरोनाच्या काळात विद्यापीठ प्रशासनाने घेतलेले निर्णय, तक्रार निवारण समितीने केलेली कार्यवाही, आदींबाबत चर्चा रंगणार आहे.
दरम्यान, विद्यापीठ शिक्षक संघाचे (सुटा) काही प्रश्न स्वीकारण्यात आले असून काही नाकारले असल्याचे सदस्य डॉ. अरुण पाटील यांनी सांगितले.