शिवाजी विद्यापीठाचा जिल्हास्तरीय युवा महोत्सव शनिवारी रंगणार महावीर महाविद्यालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 01:56 PM2018-10-26T13:56:52+5:302018-10-26T14:01:44+5:30
शिवाजी विद्यापीठाचा ३८ वा जिल्हास्तरीय युवा महोत्सव महावीर महाविद्यालयात शनिवारी (दि. २७) होणार आहे. विविध ११ कलाप्रकारांमध्ये होणाऱ्या महोत्सवासाठी ५३ संघांनी नोंदणी केली आहे. या संघाच्या माध्यमातून सुमारे ११०० विद्यार्थी कलाकार सहभागी होणार आहेत, अशी माहिती महावीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. पी. लोखंडे आणि युवा महोत्सवाचे सचिव डॉ. अरुण पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा ३८ वा जिल्हास्तरीय युवा महोत्सव महावीर महाविद्यालयात शनिवारी (दि. २७) होणार आहे. विविध ११ कलाप्रकारांमध्ये होणाऱ्या महोत्सवासाठी ५३ संघांनी नोंदणी केली आहे. या संघाच्या माध्यमातून सुमारे ११०० विद्यार्थी कलाकार सहभागी होणार आहेत, अशी माहिती महावीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. पी. लोखंडे आणि युवा महोत्सवाचे सचिव डॉ. अरुण पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
प्राचार्य लोखंडे म्हणाले, युवा महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी सकाळी दहा वाजता खासदार धनंजय महाडिक, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. महाविद्यालयाच्या श्री आचार्य विद्यानंद सांस्कृतिक भवनमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री आचार्यरत्न देशभूषण शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन अॅड. के. ए. कापसे असणार आहेत.
महोत्सवात एकांकिका, लघुनाटिका, पथनाट्य, लोकसंगीत वाद्यवृंद, लोककला, लोकनृत्य, मूकनाट्य, सुगम गायन, भारतीय समूहगीत, वादविवाद, वक्तृत्व आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा होणार आहेत. सचिव डॉ. पाटील म्हणाले, महोत्सवासाठी महाविद्यालयाच्या परिसरात पाच रंगमंच उभारण्यात आले आहेत. तयारी पूर्ण झाली आहे. या पत्रकार परिषदेस सुरेश मसुटे उपस्थित होते.
देशभूषण हायस्कूलमध्ये होणार पेपर
या महोत्सवामुळे महावीर महाविद्यालयात शनिवारी होणाऱ्या परीक्षांचे ठिकाण बदलण्यात आले आहे. सोमवार पेठेतील देशभूषण हायस्कूलमध्ये या दिवशी नियोजित वेळेत बी. ए. भाग एक (सत्र दोन), भूगोल, शारीरिक शिक्षण, बी. एस्सी. भाग एक (सत्र दोन), बी.ए.बी.एड. भाग दोन (सत्र तीन), इंग्रजी आवश्यक या विषयांचे पेपर होतील, अशी माहिती प्राचार्य लोखंडे यांनी दिली.