नव्या रूपात शिवाजी विद्यापीठाचे संकेतस्थळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 06:49 PM2019-05-20T18:49:30+5:302019-05-20T18:51:14+5:30

अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांसाठीच्या विविध योजना, आदींबाबतची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या संकेतस्थळाला नवे रूप देण्यात आले आहे. रंग-संगती, विविध शैक्षणिक संस्थांच्या लिंक्स्, दिव्यांग विद्यार्थी आणि व्यक्तींसाठी विशेष सुविधा अशा स्वरूपातील बदल या नव्या स्वरूपात समाविष्ट करण्यात आले आहेत.

Shivaji University's new website | नव्या रूपात शिवाजी विद्यापीठाचे संकेतस्थळ

नव्या रूपात शिवाजी विद्यापीठाचे संकेतस्थळ

Next
ठळक मुद्देनव्या रूपात शिवाजी विद्यापीठाचे संकेतस्थळदिव्यांगांसाठी विशेष व्यवस्था; सूचनांनुसार बदल होणार

कोल्हापूर : अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांसाठीच्या विविध योजना, आदींबाबतची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या संकेतस्थळाला नवे रूप देण्यात आले आहे. रंग-संगती, विविध शैक्षणिक संस्थांच्या लिंक्स्, दिव्यांग विद्यार्थी आणि व्यक्तींसाठी विशेष सुविधा अशा स्वरूपातील बदल या नव्या स्वरूपात समाविष्ट करण्यात आले आहेत.

सप्टेंबरमध्ये विद्यापीठ हे ‘नॅक’ मूल्यांकनाला सामोरे जाणार आहे. त्यादृष्टीने विद्यापीठ पातळीवर विविध बदल, शैक्षणिक आणि प्रशासकीय विभागांचे काम सुरू आहे. त्याअंतर्गत या संकेतस्थळाचा चेहरा-मोहरा बदलण्यात आला आहे. त्यामध्ये वापरकर्त्यांना (युझर) संकेतस्थळाच्या रंग-संगती निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नॅक मूल्यांकनाच्या पार्श्वभूमीवर या संकेतस्थळावर क्वॉलिटी पोर्टल संकल्पना राबविली आहे. त्याअंतर्गत विद्यापीठ अनुदान आयोग, नॅक, एनआयआरएफ रँकिंग, जलयुक्त युनिव्हर्सिटी आदींच्या लिंक्स मुख्य पानावर दिल्या आहेत. विद्यापीठाच्या विविध घटकांशी संबंधित आकडेवारी दिली आहे.

सर्व माहिती मराठी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. लक्षवेधक आणि वापरण्यास सोपे असे स्वरूप या संकेतस्थळाला देण्यात आले आहे. त्याचे काम प्रा. डॉ. आर. के. कामत, मिलिंद जोशी, स्वाती खराडे, के. एच. ओझा, कल्याण देवरूखकर यांचा समावेश असलेल्या समितीच्या निरीक्षणाखाली झाले आहे. जागतिक पातळीवरील ‘डब्ल्यू थ्री सी’ या निकषानुसार नव्या संकेतस्थळाची रचना केली आहे. ६० दिवसांत संकेतस्थळाचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

विश्लेषण करून नवी रचना

पूर्वीच्या संकेतस्थळावर माहिती आणि लिंक्स् यांची गर्दी झाली होती. त्यामुळे हे संकेतस्थळ किचकट वाटत होते. त्यावर बदल करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला. त्यानुसार समिती नेमून काम सुरू झाले. पहिल्यांदा जुन्या संकेतस्थळाचे विश्लेषण करण्यात आले. त्यात ज्या लिंक्सला अधिक वापरकर्त्यांनी भेट दिल्या, त्या नव्या संकेतस्थळावर मुख्य पानावर घेण्यात आल्या आहेत, अशी माहिती संकेतस्थळ निर्मिती समितीचे अध्यक्ष प्रा. आर. के. कामत यांनी दिली.

ते म्हणाले, वापरण्यास सुलभ होईल अशा स्वरूपात या संकेतस्थळाची नव्याने रचना करण्यात आली आहे. चाचणी स्वरूपात संबंधित संकेतस्थळ कार्यान्वित केले आहे. त्याबाबत वापरकर्त्यांकडून सूचना मागवून घेतल्या आहे. या सूचना लक्षात घेऊन त्यानुसार आणखी काही बदल या संकेतस्थळामध्ये केले जाणार आहेत.

स्क्रीन रीडरची सुविधा

या संकेतस्थळात नव्याने ‘स्क्रीन रीडर’ची सुविधा समाविष्ट करण्यात आली आहे. दिव्यांग विद्यार्थी, व्यक्तींसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिव्यांग असलेल्या वापरकर्त्याने संकेतस्थळावर ज्याठिकाणी स्क्रीनवरील कर्सर जाईल, ते आॅडिओ स्वरूपात त्या वापरकर्त्याला समजणार आहे.
 

Web Title: Shivaji University's new website

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.