शिवाजी विद्यापीठाचा ‘पर्ड’शी करार
By admin | Published: October 24, 2015 01:16 AM2015-10-24T01:16:54+5:302015-10-24T01:18:08+5:30
कंपवात, स्मृतिभ्रंशावरील संशोधनात विद्यापीठाचे पुढचे पाऊल
कोल्हापूर : ज्येष्ठ नागरिकांना उतारवयात सामोरे जाव्या लागणाऱ्या कंपवात आणि स्मृतिभ्रंश या दोन रोगांवरील संशोधनाबाबत शिवाजी विद्यापीठाचा जैवतंत्रज्ञान अधिविभाग व अहमदाबाद (गुजरात) येथील बी. व्ही. पटेल फार्मास्युटिकल एज्युकेशन अॅँड रिसर्च सेंटर (पर्ड) यांच्यात शुक्रवारी सामंजस्य करार केला.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सामंजस्य करारावर प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी, तर ‘पर्ड’कडून संचालक डॉ. मनीष निवसरकर यांनी स्वाक्षरी केली. यावेळी ‘बीसीयूडी’चे संचालक प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, प्रा. विश्वास बापट व जैवतंत्रज्ञान अधिविभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. ज्योती जाधव उपस्थित होते. विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागात डॉ. ज्योती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सात वर्षांपासून कंपवात (ढं१‘्रल्ल२ङ्मल्ल२ ऊ्र२ीं२ी) व स्मृतिभ्रंश (अ’९ँी्रेी१ ऊ्र२ीं२ी) या मेंदूशी संबंधित रोगांवरील संशोधन सुरू आहे. त्यांच्या उपचारांसाठी लागणाऱ्या औषधांपैकी एल-डोपा व गॅलेंटामाइन या नैसर्गिक स्वरूपात असणाऱ्या पश्चिम घाटामधील दुर्मीळ वनस्पतींचा सखोल अभ्यास या संशोधनांतर्गत केला जात आहे. डॉ. जाधव यांचे शोधनिबंध आंतरराष्ट्रीय जर्नल्समधून प्रकाशितही झाले आहेत. तसेच दोन पेटंट्सही फाइल केले आहेत. (प्रतिनिधी)
कंपवात व स्मृतिभ्रंश या रोगांसंदर्भातील संशोधनात शिवाजी विद्यापीठ देशात आघाडीवर असून, त्याला जगन्मान्यता लाभत आहे. या रोगांवरील उपचारांसाठी सदर सामंजस्य करारातून नक्कीच योग्य पर्याय उपलब्ध होऊ शकेल. या करारांतर्गत संशोधक विद्यार्थ्यांची देवाणघेवाण तसेच संशोधनासाठी काही नवीन संयुक्त प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत.
- डॉ. ज्योती जाधव