शिवाजी विद्यापीठाच्या प्रात्यक्षिक परीक्षा ऑनलाईन होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 12:12 PM2021-06-24T12:12:13+5:302021-06-24T12:14:27+5:30
Shivaji University Kolhapur : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रात्यक्षिक परीक्षा (प्रॅक्टिकल) ऑनलाईन पध्दतीने घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार शिवाजी विद्यापीठाच्यावतीने कला, वाणिज्य, विज्ञान विद्याशाखेतील अभ्यासक्रमांच्या प्रात्यक्षिक परीक्षा ऑनलाईन स्वरूपात होणार आहेत. ऑनलाईन पर्याय नोंदविलेल्या विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील १६ हजार विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा बुधवार (दि. ३०) पासून ऑनलाईन होणार आहे.
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रात्यक्षिक परीक्षा (प्रॅक्टिकल) ऑनलाईन पध्दतीने घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार शिवाजी विद्यापीठाच्यावतीने कला, वाणिज्य, विज्ञान विद्याशाखेतील अभ्यासक्रमांच्या प्रात्यक्षिक परीक्षा ऑनलाईन स्वरूपात होणार आहेत. ऑनलाईन पर्याय नोंदविलेल्या विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील १६ हजार विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा बुधवार (दि. ३०) पासून ऑनलाईन होणार आहे.
गेल्यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भावामध्ये वाढ होण्यापूर्वी विद्यापीठातील बहुतांश अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा पूर्ण झाल्या होत्या. ज्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता आली नाही. त्यांना विद्यापीठाने निश्चित केलेल्या सूत्रानुसार या परीक्षांचे गुण देण्यात आले. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने विद्यापीठ आणि महाविद्यालयांमधील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे वर्ग ऑनलाईन पध्दतीने भरले आहेत.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा यूजीसीच्या सूचनेनुसार ऑनलाईन स्वरूपात विद्यापीठाकडून घेतल्या जाणार आहेत. त्यामध्ये बी. एस्सी., एम. एस्सी. अभ्यासक्रमांतील अधिक विषयांच्या परीक्षांचा समावेश आहे. याबाबत विद्यापीठ अधिकार मंडळांनी घेतलेल्या निर्णयानुसार संलग्नित महाविद्यालये आणि विद्यापीठातील विविध अधिविभागांना सूचना केल्या जाणार आहेत.
ऑफलाईनकडून ऑनलाईन पर्याय नोंदविलेल्या आणि तांत्रिक अडचणीमुळे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नव्हती. अशा कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील १६ हजार विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा ऑनलाईन पध्दतीने बुधवारपासून होणार आहे. त्याचे सविस्तर वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर झाले आहे. विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील ६२१ परीक्षा पूर्ण झाल्या आहेत. त्यापैकी ९५ टक्के परीक्षांचे निकाल आतापर्यंत जाहीर करण्यात आले असल्याची माहिती परीक्षा मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी दिली.
आजपासून मॉक टेस्ट
ऑनलाईन स्वरूपात होणाऱ्या पुनर्परीक्षेसाठीची सराव चाचणी (मॉक टेस्ट) आज, गुरुवारपासून परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून घेतली जाणार आहे. त्याबाबतचे संदेश विद्यार्थ्यांना पाठविण्यात आले आहेत.