शालेय शिक्षणातील गुणवत्तावाढीसाठी ‘डाएट’ला शिवाजी विद्यापीठाची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:26 AM2021-08-26T04:26:21+5:302021-08-26T04:26:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षणातील बदलते तंत्रज्ञान आणि माहिती आदान-प्रदान करून विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्यासह ...

Shivaji University's support to 'DIET' to improve the quality of school education | शालेय शिक्षणातील गुणवत्तावाढीसाठी ‘डाएट’ला शिवाजी विद्यापीठाची साथ

शालेय शिक्षणातील गुणवत्तावाढीसाठी ‘डाएट’ला शिवाजी विद्यापीठाची साथ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षणातील बदलते तंत्रज्ञान आणि माहिती आदान-प्रदान करून विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्यासह गुणवत्तावाढीसाठी कोल्हापूर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेला (डाएट) आता शिवाजी विद्यापीठाची साथ मिळाली आहे. या दोन्ही शैक्षणिक संस्थांमध्ये सन २०२१ ते २०२४ या कालावधीसाठी सामंजस्य करार झाला आहे. त्याद्वारे शिक्षक अद्ययावत होणार आहेत. विद्यापीठासमवेत करार करणारी डाएट ही राज्यातील पहिली संस्था ठरली आहे.

‘डाएट’मध्ये शैक्षणिक प्रशिक्षण, मानसशास्त्र, व्यवस्थापन, समावेशित शिक्षण, ज्ञानरचनावाद, शैक्षणिक तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन आणि समुपदेशन, शैक्षणिक कृती संशोधन, पूर्वप्राथमिक शिक्षण, ऑनलाइन शिक्षण या विषयांबाबत शिक्षकांना मार्गदर्शन केले जाते. या विषयांसाठी शिवाजी विद्यापीठात स्वतंत्र विभाग असल्याने त्या विषयांमध्ये सखोल, सर्वंकष माहितीचा उत्तम स्रोत म्हणून विद्यापीठ हे ‘डाएट’ला भक्कम आधार ठरणार आहे. हा सामंजस्य करार शालेय आणि उच्च शिक्षणाला जोडणारा दुवा ठरणार आहे. दरम्यान, या करारावर गेल्या आठवड्यात विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, शिक्षणशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. प्रतिभा पाटणकर, ‘डाएट’चे प्राचार्य डॉ. आय. सी. शेख, नियोजन, व्यवस्थापन आणि प्रशासन विभागप्रमुख आर. व्ही. कांबळे यांनी स्वाक्षरी केली. कराराचे पत्र सोमवारी ‘डाएट’ला मिळाले.

चौकट

कराराचा असा होणार उपयोग

या सामंजस्य करारामुळे डाएटमध्ये शैक्षणिक संशोधन केंद्र स्थापन होणार आहे. पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांना विविध शैक्षणिक कृतींमध्ये सहभागी होणे. शिक्षकांना अध्यापन, संशोधन व प्रशिक्षणामध्ये विचारांची देवाण-घेवाण करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. प्राथमिक ते उच्च शिक्षणातील या सर्व स्तरांमध्ये समन्वय साधून विद्यापीठ आणि डाएट संयुक्त विद्यमानाने सुरू केलेल्या शैक्षणिक कृतींमध्ये सहभाग घेता येणार आहे. शिक्षणशास्त्र पदवी, पदविका, एमफिल, पीएचडीच्या विद्यार्थ्यांना या शैक्षणिक कृतींमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

प्रतिक्रिया

या सामंजस्य करारामुळे शिवाजी विद्यापीठातील संशोधन, पायाभूत सुविधा, शासकीय योजना, प्रशिक्षण, कार्यशाळा, नवीन तंत्रज्ञान, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षण देणाऱ्या २० हजार शिक्षकांना अद्ययावत होण्यासाठी ज्ञान मिळणार आहे.

-आय. सी. शेख, प्राचार्य, डाएट

Web Title: Shivaji University's support to 'DIET' to improve the quality of school education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.