शिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:25 AM2021-03-23T04:25:34+5:302021-03-23T04:25:34+5:30
विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विविध महाविद्यालयांमध्ये सोमवारी दिवसभरात विविध सत्रांमध्ये कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करून परीक्षा सुरू करण्यात आल्या. त्यामध्ये बी.एस्सी. बायोटेक., ...
विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विविध महाविद्यालयांमध्ये सोमवारी दिवसभरात विविध सत्रांमध्ये कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करून परीक्षा सुरू करण्यात आल्या. त्यामध्ये बी.एस्सी. बायोटेक., आयटी., शुगर टेक., ॲनिमेशन., फॉरेन्सिक सायन्स., फूड प्रोसेसिंग अँड पॅक., कॉम्प्युटर सायन्स., बीसीएस., बीबीए., बीसीए., बी.एस.डब्ल्यू, बीआयडी., बीडीएससी., बीएफटीएम. आणि बी.व्होकच्या विविध १२ अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा समावेश आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने या परीक्षा घेण्यात आल्या. सोशल डिस्टन्सिंग ठेवत विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यासाठी एक तासाची ५० गुणांची प्रश्नपत्रिका होती. त्यामध्ये बहुपर्यायी स्वरूपातील प्रश्न होते. दरम्यान, या सत्रातील परीक्षा देण्यासाठी सुमारे ६१ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन, तर ६३ हजार विद्यार्थ्यांनी ऑफलाईन पद्धतीचा पर्याय निवडला आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे परीक्षा देण्याकरिता ऑनलाईन पर्याय निवडीची मुदत वाढविण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी, पालकांकडून झाली. त्यानुसार ऑनलाईन पर्याय निवडीसाठी बुधवार (दि. २४)पर्यंत मुदत वाढविली असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी दिली.
चौकट
अंतिम वर्षाचे वेळापत्रक दोन दिवसांत
विषयाच्या सांकेतिक क्रमांकातील तांत्रिक अडचणीमुळे विद्यापीठाने हिवाळी सत्रातील बी.ए., बी.कॉम., बी. एस्सी.सह पाच अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा लांबणीवर टाकल्या आहेत. या परीक्षांचे वेळापत्रक येत्या दोन दिवसांत परीक्षा मंडळाकडून जाहीर केले जाणार आहे.
प्रतिक्रिया
विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि कोरोनाच्या नियमांचे पालन करीत आम्ही हिवाळी सत्रातील परीक्षांची सुरुवात केली आहे.
-डॉ. राजेंद्र लोखंडे, प्राचार्य, महावीर महाविद्यालय.
फोटो (२२०३२०२१-कोल-विद्यापीठ परीक्षा ०१, ०२) : शिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षांना सोमवारी प्रारंभ झाला. कोल्हापूर शहरातील कमला महाविद्यालयात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत बी. व्होक आणि बीसीए अभ्यासक्रमाची विद्यार्थिनींनी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा दिली.