शिवाजी पुलाचे उद्घाटन मंत्र्यांना करू देणार नाही - : कृती समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 12:38 AM2019-05-30T00:38:39+5:302019-05-30T00:40:17+5:30
पर्यायी शिवाजी पुलाच्या उद्घाटनाचा प्रश्न चिघळला असून, पालकमंत्री अगर इतर मंत्र्यांना या पुलाचे उद्घाटन करू दिले जाणार नाही. जनरेट्यामुळे पुलाचे काम पूर्ण झाले असल्याने त्याचे श्रेय घेण्यासाठी कोणीही प्रयत्न करू नये; त्याऐवजी सामान्य नागरिकांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करण्यात यावे, असा पवित्रा सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने
कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पुलाच्या उद्घाटनाचा प्रश्न चिघळला असून, पालकमंत्री अगर इतर मंत्र्यांना या पुलाचे उद्घाटन करू दिले जाणार नाही. जनरेट्यामुळे पुलाचे काम पूर्ण झाले असल्याने त्याचे श्रेय घेण्यासाठी कोणीही प्रयत्न करू नये; त्याऐवजी सामान्य नागरिकांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करण्यात यावे, असा पवित्रा सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने बुधवारी घेतला.
पुलाच्या उद्घाटनावरून सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने निमंत्रक आर. के. पोवार यांच्या नेतृत्वाखाली राष्टÑीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक भोसले यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. भोसले यांनी याप्रश्नी शासन आणि कृती समिती यांच्यात समन्वयाने मार्ग काढू, असे आश्वासन दिले.
पर्यायी शिवाजी पुलाचे काम जनरेट्यामुळे झाल्याची भावना कृती समितीने बैठकीत व्यक्तकेली; त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने पुलाचे उद्घाटन करून वाहतूक सुरळीत करावी, असे सुचविण्यात आले. पुलाच्या पश्चिमेकडील बाजूने ग्रामीण भागातील जनता तर पूर्वेकडून शहरातील सामान्य नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन केले जाईल, अशीही माहिती बाबा पार्टे यांनी दिली. कार्यकारी अभियंता भोसले यांनी उद्घाटन कार्यक्रमात अडचणी आणू नये, पुलाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे येणार आहेत. त्याबाबतचा कार्यक्रम हा दिल्लीमध्ये ठरणार असल्याचे सांगितले.
पुलाचे काम १०० टक्केपूर्ण झाल्यास त्यावरून वाहतूक सुरू करावी, उद्घाटनाबाबत मंत्र्यांबाबतीत जनतेत रोष असल्याची माहिती वरिष्ठ पातळीवर प्रशासनास कळवावी, असेही यावेळी आर. के. पोवार यांनी सांगितले. त्यावेळी प्रशासनातील अधिकारी आणि जनता यांच्यात समन्वयाने तोडगा काढण्यात यावा, असाही प्रस्ताव यावेळी पुढे आला.
या बैठकीत संभाजीराव जगदाळे, किशोर घाटगे, नामदेवराव गावडे, अशोक पोवार, सतीशचंद्र कांबळे, स्वप्निल पार्टे, रमेश मोरे, जयकुमार शिंदे यांनीही भावना व्यक्तकेल्या व मंत्र्यांनी उद्घाटन करू नये, अशी ठाम भूमिका घेतली. जनतेच्या रोषाची भूमिका आपण जिल्हा प्रशासनास कळवावी, असे कार्यकारी अभियंता भोसले यांनी आंदोलकांना सांगितले. या बैठकीस प्रसाद जाधव, बी. एल. बरगे, किसन कल्याणकर, पंडितराव सडोलीकर, आदी उपस्थित होते.
आठवड्यात उद्घाटन, नियोजन सुरु
पर्यायी पुलाचे उद्घाटन आठवड्याभरात होण्याची शक्यता आहे. त्याबाबतची तारीख दिल्लीतून निश्चित होणार आहे. या पुलाचे उद्घाटन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत होण्याची शक्यता आहे. त्याबाबतचे नियोजन करण्याचे काम वरिष्ठ पातळीवरून ठरणार आहे.
...तर कोनशिला फोडणार
पुलाच्या उद्घाटनाच्या कोनशिलावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव आल्यास कोनशिला फोडणार, तसेच काळे फासण्याचा इशारा यावेळी बैठकीत देण्यात आला.
पर्यायी शिवाजी पुलाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने बुधवारी सायंकाळी राष्टÑीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक भोसले यांची भेट घेऊन चर्चा केली.