तीन लाख शिवभक्तांच्या उपस्थितीत रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 06:43 PM2018-05-29T18:43:13+5:302018-05-29T18:46:54+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तो ६ जून हा दिवस ‘राष्ट्रीय सण’ म्हणून साजरा करण्यासाठी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने दोन दिवस रायगडावर विविध ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्ष अमर पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तो ६ जून हा दिवस ‘राष्ट्रीय सण’ म्हणून साजरा करण्यासाठी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने दोन दिवस रायगडावर विविध ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्ष अमर पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी स्वराज्याची उभारणी केली. त्यांचा दि. ६ जून १६७४ रोजी राज्याभिषेक झाला आणि स्वराज्याला छत्रपती मिळाले. हा दिवस ‘भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन’ असून त्याचा राष्ट्रीय सणाप्रमाणे लोकोत्सव व्हावा यासाठी समिती कार्यरत आहे. दरवर्षी दि. ५ व ६ जूनला रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करून तरुणाईमध्ये पुन्हा स्वराज्याचे स्फुल्लिंग पेटविले जाते.
यंदा महोत्सवासाठी देशभरातून तीन लाख शिवभक्त उपस्थित राहतील, असा अंदाज आहे. नियोजनासाठी ४० प्रकारच्या वेगवेगळ्या समित्या करण्यात आल्या असून त्यांच्याकडून तयारी सुरू आहे. गडावर पिण्याचे पाणी, अन्नछत्र, ज्येष्ठांसह महत्त्वाच्या व्यक्तींसाठी रोप वेची सोय असणार आहे. अनुचित प्रकार घडू नये यासाठी अधिकाऱ्यांसह शंभराहून अधिक पोलीस कार्यरत असतील.
प्लास्टिकमुक्त महोत्सवासाठी शिवभक्तांनी आपल्या सोबत ताट, वाटी आणि पाण्यासाठी बाटली घेऊन यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. परिषदेस फत्तेसिंह सावंत, कार्याध्यक्ष हेमंत साळोखे, शाहीर आझाद नायकवडी, गणी आजरेकर आदी उपस्थित होते.
महिलांसाठी विशेष सोय
गडावरील या सोहळ्याचा लाभ महिला व मुलींनाही घेता यावा या उद्देशाने त्यांच्यासाठी राहण्याची, स्वच्छतागृहाची स्वतंत्र सोय करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणीही वेगळी बैठक व्यवस्था असून महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
असे आहेत कार्यक्रम
दिनांक ५ जून
सकाळी ७ वाजता : रायगड विकास प्राधिकरण आयोजित दुर्गराज रायगड स्वच्छता मोहीम. स्थळ : चित्त दरवाजा.
दुपारी १२.३० वाजता : अन्नछत्र उद्घाटन, स्थळ : जिल्हा परिषद विश्रामगृह, किल्ले रायगड
दुपारी ३.३० वाजता : खासदार संभाजीराजे व शहाजीराजे छत्रपती यांचे चित्त दरवाजा येथे स्वागत व पायी गड चालण्यास प्रारंभ
दुपारी ४.३० वाजता . : गडपूजन स्थळ : नगारखाना.
सायंकाळी ६.०० वाजता : गडावर उत्खननात मिळालेल्या वस्तूंचे प्रदर्शन स्थळ : हत्तीखाना.
सायंकाळी ६.३० वा. : मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक, स्थळ : होळीचा माळ
सायंकाळी ७ वाजता : शाहिरी कार्यक्रम, स्थळ : राजसदर.
रात्री ८ वाजता : खासदार संभाजीराजे यांचा शिवभक्तांशी संवाद स्थळ : राजसदर.
रात्री ८.३० वाजता. : गडदेवता शिरकाई देवीचा गोंधळ, स्थळ : शिरकाई मंदिर.
रात्री ९.०० वाजता : जगदिश्वराची वारकरी सांप्रदायाकडून कीर्तन, जागर व काकड आरती, स्थळ : जगदिश्वर मंदिर
रात्री ९ वाजता : ही रात्र शाहिरांची कार्यक्रम
दिनांक ६ जून
स. ६.०० वाजता : ध्वजपूजन, स्थळ : नगारखाना.
सकाळी ६ वाजून ५० मिनिटे : शाहिरी कार्यक्रम, स्थळ : राजसदर.
सकाळी ९. ३० वाजता : शिवाजी महाराजांच्या पालखीचे आगमन, स्थळ : राजसदर.
सकाळी ९. ५०. वाजता : खासदार संभाजीराजे व शहाजीराजे मिरवणुकीने राजसदरेकडे रवाना
सकाळी १०. १० मिनिटे : संभाजीराजे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक
सकाळी १० २० मिनिटे : मेघडंबरीतील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास सुवर्णनाण्यांचा अभिषेक
सकाळी १०.३० वाजता : खासदार संभाजीराजे यांचे शिवभक्तांना मार्गदर्शन
सकाळी ११ वाजता : पालखी सोहळ्यास प्रारंभ
दुपारी १२ वाजता : जगदिश्वर मंदिर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधिस्थळाला पुष्पहार अर्पण व कार्यक्रमाची सांगता.