शिवारेतील जवानाचा हिमाचल प्रदेशमध्ये मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:16 AM2021-07-05T04:16:57+5:302021-07-05T04:16:57+5:30
सरुड : शिवारे (ता. शाहूवाडी) येथील अजित बाजीराव पाटील (वय २९) या सीआयएसएफच्या जवानाचा हिमाचल प्रदेशमधील चंबा जिल्ह्यात मृत्यू ...
सरुड :
शिवारे (ता. शाहूवाडी) येथील अजित बाजीराव पाटील (वय २९) या सीआयएसएफच्या जवानाचा हिमाचल प्रदेशमधील चंबा जिल्ह्यात मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री ११ वाजता घडली. रविवारी दुपारी मृत अजितच्या पार्थिवावर शिवारे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान अजितच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेले नाही. एकुलता एक असणारा अजित हा १२वी उत्तीर्ण झाल्यानंतर २०१४ मध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल ( सीआयएसएफ) मध्ये भरती झाला. सध्या तो हिमाचल प्रदेश मधील चंबा जिल्ह्यात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होता. दीड वर्षापूर्वीच अजितचा विवाह झाला होता. त्याला दहा महिन्यांचा लहान मुलगा आहे. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास अजितचे पार्थिव पुणे येथून शववाहिकेतून शिवारे येथे आणण्यात आले . त्यानंतर फुलानी सजवलेल्या ट्रॉलीतून गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळून अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र देशमुख, नायब तहसीलदार विलास कोळी, मंडल अधिकारी बी .आर. माळी, तलाठी एच. एस. बदडे या शासकीय प्रतिनिधींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अजितच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, चुलते असा मोठा परिवार आहे. रक्षा विसर्जन मंगळवार दि. ६ रोजी आहे.
०४ अजित पाटील