शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीतून शिवचरित्राचा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 01:40 PM2019-05-07T13:40:39+5:302019-05-07T13:43:10+5:30
पारंपरिक वाद्यांचा गजर, ‘शिवरायांचा जयजयकार’, घोड्यांसह लवाजमा, मल्लखांबचे प्रात्यक्षिक, शिवशाहीतील प्रसंगांद्वारे प्रबोधनपर संदेश, अशा उत्साही वातावरणात संयुक्त राजारामपुरी यांच्यावतीने शिवजयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. सलग तीन वर्षे राजारामपुरी परिसरातील मंडळांनी एकत्र येऊन शिवजयंती साजरी करण्यात येते.
कोल्हापूर : पारंपरिक वाद्यांचा गजर, ‘शिवरायांचा जयजयकार’, घोड्यांसह लवाजमा, मल्लखांबचे प्रात्यक्षिक, शिवशाहीतील प्रसंगांद्वारे प्रबोधनपर संदेश, अशा उत्साही वातावरणात संयुक्त राजारामपुरी यांच्यावतीने शिवजयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. सलग तीन वर्षे राजारामपुरी परिसरातील मंडळांनी एकत्र येऊन शिवजयंती साजरी करण्यात येते.
सोमवारी सकाळी मारुती मंदिर येथे उभारण्यात आलेल्या भव्य व्यासपीठावर शिवजन्म सोहळा उत्साहात पार पडला. सायंकाळी सायबर चौक येथे शिवजयंती मिरवणुकीचे उद्घाटन शाहू छत्रपती यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर सरिता मोरे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सतेज पाटील, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख संजय मंडलिक, उद्योजक चंद्रकांत जाधव यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
शिवपालखी, छत्रपती शिवरायांची सिंहासनाधिष्ठीत मूर्ती आणि त्यापुढे घोडे, बाल शिवाजी, मावळ्यांच्या वेशभूषेतील बालचमू अशा लवाजम्यांसह मिरवणुकीची सुरुवात झाली. ‘आम्ही कोल्हापुरी’ ढोल पथकाने मिरवणूक दणाणून सोडली. ‘शिवगाथा’ या सजीव देखाव्यांतून शिवशाहीचे दर्शन घडले. एलइडी स्क्रीनवर शिवरायांची महिती सांगणारी गाणी दाखविण्यात येत होती. तसेच शिवरायांच्या जयजयकारांत मिरवणूक पुढे सरकत होती. मिरवणूक मार्गावर रांगोळ्यांची सजावट करण्यात आली होती.
माउली चौक, नऊ नंबर शाळा, कॅसल हॉटेल, जनता बझार चौकामार्गे राजारामपुरी मुख्य रस्त्यावरून मारुती मंदिर येथे मिरवणुकीची सांगता झाली. पारंपरिक वेशभूषेत महिला, युवतींचा लक्षणीय सहभाग होता.
महिलांची उपस्थिती लक्षणीय ...
पारंपरिक वेशभूषा व भगवे फेटे परिधान करून महिला, युवतींचा मिरवणुकीत लक्षणीय सहभाग होता. यासह मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांसह मोठ्या संख्येने महिलाही बाहेर पडल्या होत्या.
- पारंपरिक वाद्यांचा गजर
- शिस्तबद्ध मिरवणूक
- महिला व बालकांचा लक्षणीय सहभाग