शिवतारे यांचा दौरा दिलासा देणार?
By admin | Published: April 22, 2016 12:19 AM2016-04-22T00:19:03+5:302016-04-22T00:51:35+5:30
राधानगरी तालुका : प्रकल्पांची पाहणी करणार
संजय पारकर -- राधानगरी --पाण्याचा खजिना म्हणून जिल्ह्यात ओळख असलेल्या राधानगरी तालुक्यात पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. काही प्रकल्प अपूर्ण, तर जुन्या प्रकल्पाच्या देखभालीकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे लोकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. पाटबंधारे राज्यमंत्री विजय शिवतारे आज, शुक्रवारी तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ते काही प्रकल्पांची पाहणी करणार आहेत. त्यांच्या दौऱ्याने तरी यापैकी काही प्रश्न सुटतात की हा केवळ फार्स ठरतो हे नजीकच्या काळात स्पष्ट होईल.
राजर्षी शाहू महाराजांनी उभारणी केलेल्या ऐतिहासिक राधानगरी धरणावरील राज्यातील पहिला जल विद्युतनिर्मिती प्रकल्प सध्या संक्रमणावस्थेत आहे. दहा वर्षांपूर्वी स्वीकारलेल्या ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ या धोरणानुसार येथे या प्रकाराचाही राज्यातील पहिला प्रकल्प सुरू झाला आहे. यावेळी वरिष्ठ पातळीवर झालेल्या करारानुसार जुना प्रकल्प पूर्णपणे बंद करण्याची अट आहे. मात्र, त्यात शासनाच्या हितालाच हरताळ फासला आहे. किरकोळ देखभाल केली तर हा प्रकल्प आजही पूर्ण क्षमतेने चालू शकतो. मात्र, त्याला पाणीच मिळत नाही.
या धरण परिसरात शाहू महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी जिल्हा परिषदेने खास तरतूद केली आहे. त्यालाही नियमांच्या आडून विरोध केला जात आहे. धरण उभारणी काळात हत्तीमहाल येथे विश्रामग्रह व वसाहत उभारली होती. देखभाल नसल्याने हे विश्रामगृह कुलूपबंद आहे, तर वसाहत ओस पडण्याच्या वाटेवर आहे.
शंभर वर्षे पूर्ण झालेल्या राधानगरी धरणात रिकाम्या झालेल्या भागात सध्या प्रचंड गाळ साचल्याचे दिसते. येथे प्रचंड पाऊस पडतो, पण क्षमता कमी आहे. कितीतरी पाणी पावसाळ्यात वाहून जाते. या धरणावरील स्वयंचलित दरवाजे हा येथील ऐतिहासिक वारसा आहे. त्याची रचना बदलण्यासाठी हालचाली सुरू आहेत. त्याला लोकांचा विरोध आहे त्याचीही दखल घ्यावी लागणार आहे.