दिल्लीत प्रथमच घुमणार ‘शिवगर्जना’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:46 AM2018-02-15T00:46:45+5:302018-02-15T00:46:50+5:30
कोल्हापूर : अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे यंदा प्रथमच दिल्ली येथे शिवजयंती उत्सवाचे आयोजन केले आहे. या उत्सवात छत्रपती शिवरायांच्या विचार कार्यावर आधारित ‘शिवगर्जना’ या महानाट्याचे होणारे सादरीकरण हेच मुख्य आकर्षण राहणार आहे.
खासदार संभाजीराजे यांच्या विशेष प्रयत्नांतून दिल्ली येथे शिवजयंती उत्सव होत आहे. दिल्लीतील इंदिरा गांधी राष्टÑीय कला केंद्र येथे सोमवारी (दि. १९) सायंकाळी ६ वाजता या शिवगर्जना महानाट्याचा ५० वा प्रयोग होत आहे. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी या महानाट्याचे लेखन केले आहे. या महानाट्याचे यापूर्वी दिल्ली, जम्मू-काश्मीर, कानपूर, जामनगर (गुजरात), बिकानेर (राजस्थान), बेळगाव, निपाणी, कोल्हापूर, अक्कलकोट, सांगली, सातारा, मंचर, पुणे, बीड या ठिकाणी प्रयोग झाले आहेत. या महानाट्यात ३०० हून अधिक कलाकारांचा समावेश आहे. ६० फूट उंच रंगमंच, हत्ती, घोडे, उंट यांचा प्रत्यक्ष वावर, चित्तथरारक लढाया, नेत्रदीपक प्रकाश योजना, नेत्रसुखद आतषबाजी, मंत्रमुग्ध संगीत, अशा अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असे हे महानाट्य दिल्लीत शिवजयंतीदिनी आकर्षक ठरणार आहे. या महानाट्याच्या निमित्ताने शिवरायांची अस्सल पत्रे संवादरूपाने प्रेक्षकांसमोर येत आहेत. छत्रपती शिवरायांच्या विचार आणि कार्याला जगभर पोहोचण्यासाठी शिवसेवा करण्याचा मानस या महानाट्यातून असल्याची भावना सर्व कलाकारांनी व्यक्त केली आहे.