शिवनाकवाडीतील मुलांना हवाय मायेचा हात!
By admin | Published: September 14, 2016 12:04 AM2016-09-14T00:04:03+5:302016-09-14T00:47:59+5:30
बापानेच आईचा खून केल्याने मुले निराधार : सामाजिक, दानशूर व्यक्तींकडून मदतीची गरज
गणपती कोळी -- कुरूंदवाड-शिवनाकवाडी (ता. शिरोळ) येथे सोमवारी पत्नी रुपालीचा राजेंद्र यशवंत माळी याने खून केल्याने या दाम्पत्यांची तीनही मुले निराधार बनली आहेत. वडिलांनी घरच सोडल्याने या मुलांना आईचाच आधार होता. मात्र, व्यसनी बापाने आईचाच खून करुन मुलांचा आधारही हिरावून घेतल्याने मुले पोरकी बनली आहेत. त्यामुळे या मुलांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून, पुन्हा उभारी देण्यासाठी मायेचा आधार देणाऱ्या माणसांची गरज आहे.
माळी कुटुंबीय मूळचे हातकणंगले तालुक्यातील अंबप गावचे. अत्यल्प शेती त्यामुळे काम करुन कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी रुपाली व राजेंद्र पंधरा वर्षांपूर्वी शिवनाकवाडी येथे वास्तव्यास आले. राजेंद्र गावालगत असलेल्या आवाडे पेपर मिलमध्ये नोकरीस होता. त्यांना कोमल, मधुरा या दोन मुली तर शुभम् एक मुलगा आहे. घरचा चरितार्थ चालविताना पती-पत्नीमध्ये खटके उडत असत. त्यातच राजेंद्र व्यसनाच्या आहारी गेल्याने व नोकरीही सोडल्याने पत्नीकडेच वारंवार पैशाची मागणी करत असल्यामुळे त्यांच्यामध्ये वारंवार तंटा निर्माण होत होता.
राजेंद्र गावातच एका धाब्यावर कामाला जावून आलेल्या पैशातून चैनी करत बाहेरच फिरायचा. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा खर्च व संसाराचा गाढा चालविण्यासाठी रुपाली यंत्रमागामध्ये कांड्या भरण्याचे काम करीत होती. वडील व्यसनी व घरी येत नसल्याने मुलांना आईचाच आधार होता. मात्र, वडिलांनी आईचाच खून केल्याने मुलांच्या पायाखालची माती सरकून डोक्यावरचे छत्र हरवले आहे.
थोरली मुलगी कोमल इचलकरंजी येथील गंगामाई गर्ल्स हायस्कूलमध्ये अकरावी कॉमर्समध्ये शिकत आहे. मधुरा इयत्ता नववी तर मुलगा शुभम् इयत्ता आठवी शिवनाकवाडी येथे माध्यमिक शाळेत शिकत आहेत. शुभम् शारीरिकदृष्ट्या अशक्त असून वारंवार दवाखाना चालू असतो. व्यसनाधीन पतीची साथ नसतानाही केवळ मुलांना शिक्षण देऊन आपल्यासारखे जीवन त्यांच्या वाट्यास येऊ नये म्हणून स्वत: कष्ट करत मुलांना शिक्षण देण्यासाठी रुपालीची धडपड चालू होती. यातच पैशाच्या मागणीवरुन निर्दयी बापाने आईचाच खून केला.
मृत रुपालीचे माहेर करवीर तालुक्यातील पोहाळे (कुशिरे) हे असून, आई-वडील हयात नसल्याने माहेरचेही दार बंद आहे. तर सासरी तुटपुंज्या जमिनीसाठी सासू-सासरेही जवळ घेत नसल्याने मुलांना आईचा तर आईला मुलांचा आधार होता. एकमेकांना आधार देत जीवन जगत असताना निर्दयी बापाने पत्नीचा खून करून आईचे छत्रही हिरावून घेतल्याने मुलेही भेदरली आहेत. आसरा देणारे, मायेची फुंकर घालणारे कोणीच नसल्याने मुले आईच्या फोटोकडे पाहात अद्यापही हंबरडा फोडत आहेत. शत्रूच्या वाट्यालाही असा प्रसंग येऊ नये, असे पाहणाऱ्यातून बोलत त्यांच्याही डोळ्यातून अश्रू ठिपकत आहेत. सध्या त्या मुलांना आधार देण्यासाठी त्यांच्या मावश्या दीपाली माळी (रा. सौंदलगा, ता. चिकोडी), शोभा मगदूम (मोहरे, ता. पन्हाळा) व सुवर्णा माळी (हुपरीे) या मुलांना धीर देत आहेत. आईचे छत्र हरपलेल्या या मुलांना मायेचा आधार देणाऱ्या माणसांची गरज आहे. मुलांना शिक्षणाबरोबर त्यांच्या आहाराची, सुरक्षेची जबाबदारी घेणाऱ्या संस्था, व्यक्तिंनी पुढाकार घेतल्यास या मुलांना मायेचे मातृत्व मिळाल्यास दु:ख विसरून मुले नव्या जोमाने उभे राहतील व त्यांना आधार मिळेल.
ग्रामस्थांनीच केले अंत्यसंस्कार
रुपाली माळी हिच्या खुनानंतर तीन मुले पोरकी झाल्याची चर्चा शिवनाकवाडी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. यामुळे ग्रामस्थांनी निधी गोळा करुन अंत्यसंस्कारासाठी खर्च केला व इचलकरंजीचे पोलिस उपअधीक्षक विनायक नरळे यांनी मदतीचे आवाहन केले होते.
यास प्रतिसाद देत गावातील तरुण मंडळांनी आर्थिक सहाय्य या मुलांना देण्याचे ठरविले असून, अन्य संस्था मदत देण्यासाठी सरसावत आहेत.
हुशार असून, आर्थिक अडचण
थोरली मुलगी कोमल अत्यंत हुशार असून, दहावीला तिने ८३ टक्के गुण घेवून शिवनाकवाडी विद्यालयात तिसरा क्रमांक घेतला होता. तिला विज्ञान शाखेत प्रवेश घ्यावयाचा होता. मात्र घरची आर्थिक परिस्थिती नसल्याने वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. त्यामुळे हुशार असूनही केवळ आर्थिक अडचणीमुळे प्रवेश घेता आला नाही.