शिवरायांना मानाचा मुजरा शिवराज्याभिषेक दिन : मराठा महासंघातर्फे भव्य मिरवणुकीचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 12:42 AM2018-06-07T00:42:38+5:302018-06-07T00:42:38+5:30
‘छत्रपती शिवाजी महाराज की जयऽ ऽ’ ,‘जय भवानी, जय शिवाजी’चा अखंड जयघोष, भिरभिरणारे भगवे झेंडे, ढोल-ताशांचा गजर, भजनी मंडळे, समाजप्रबोधनाचे फलक आणि मर्दानी खेळांची चित्तथरारक
कोल्हापूर : ‘छत्रपती शिवाजी महाराज की जयऽ ऽ’ ,‘जय भवानी, जय शिवाजी’चा अखंड जयघोष, भिरभिरणारे भगवे झेंडे, ढोल-ताशांचा गजर, भजनी मंडळे, समाजप्रबोधनाचे फलक आणि मर्दानी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके अशा वातावरणात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवरायांना मानाचा मुजरा करण्यात आला. यानिमित्त अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हा शाखेच्यावतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली.
शिवराज्याभिषेकाचा मुख्य सोहळा रायगडावर झाल्यानंतर बुधवारी संध्याकाळी मराठा महासंघाच्यावतीने मंगळवार पेठ येथील जिल्हा कार्यालयापासून या मिरवणुकीस प्रारंभ झाला. छत्रपती शिवरायांच्या सिंहासनारूढ पुतळ्याचे पूजन खासदार धनंजय महाडिक यांच्याहस्ते करून मिरवणुकीची सुरुवात झाली. यात सहभागी रिक्षांवर समाजप्रबोधनपर फलक लावण्यात आले होते. त्यापाठोपाठ मर्दानी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखविण्यात येत होती. ती पाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. येथील ढोल व झांजपथकाने मिरवणुकीत उत्साह संचारला होता. यासह सद्गुरू ज्ञानेश्वर माउली भजन मंडळ, विठ्ठल भक्त मंडळ, आदी भजनी मंडळांनी सहभागी होऊन मिरवणुकीत एक वेगळेच चैतन्य आणले होते.
अनेक शिवप्रेमी मिरवणुकीत बाल शिवाजी, जिजाऊ यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा परिधान करून सहभागी झाले होते. फुलांनी सजविलेल्या ट्रॉलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची सिंहासनारूढ आकर्षक मूर्ती ठेवण्यात आली होती. मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, शिवाजी चौक येथे या मिरवणुकीची सांगता झाली.
मिरवणुकीचे आयोजन मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले होते. मिरवणुकीत महापौर शोभा बोंद्रे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, उद्योजक चंद्रकांत जाधव, माजी महापौर आर. के. पोवार, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, रामेश्वर पतकी, शशिकांत पाटील, भगवानराव काटे, बबन रानगे, डॉ. शिवाजीराव हिलगे, महादेवराव पाटील, अवधूत पाटील, डॉ. संदीप पाटील, डॉ. प्रवीण कोडोलीकर, नीलेश साळुंखे, भारती पाटील, नेहा मुळीक, आदी सहभागी झाले होते.
महिलांचा उल्लेखनीय सहभाग
अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे काढण्यात आलेल्या बुधवारच्या मिरवणुकीत मराठा महासंघाच्या महिला आघाडीच्या कणेरीवाडी, उजळाईवाडी येथील महिला भगव्या साड्या व भगवे फेटे परिधान करून सहभागी झाल्या होत्या.
शिवराज्याभिषेकाचा मुख्य सोहळा रायगडावर झाल्यानंतर बुधवारी संध्याकाळी कोल्हापुरात अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने मंगळवार पेठ येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली.