शिवरायांना मानाचा मुजरा!
By admin | Published: February 20, 2017 12:46 AM2017-02-20T00:46:14+5:302017-02-20T00:46:14+5:30
शिवाजी तरुण मंडळ : लक्षवेधी मिरवणूक; हजारो मावळ्यांचा सहभाग
कोल्हापूर : फडफडणारे भगवे ध्वज, पताका, छत्रपती शिवरायांच्या आठवणींना उजाळा देणारे पोवाडे तसेच ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा तरुणाईचा उत्साह वाढविणाऱ्या जयघोषांनी रविवारी कोल्हापुरात युगपुरुष छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी झाली. संपूर्ण शहरात भगवे वातावरण निर्माण झाले होते. चौकाचौकांत शिवरायांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले होते. सायंकाळी श्री शिवाजी तरुण मंडळ आणि मुस्लिम ब्रिगेडतर्फे शहरातून भव्य सवाद्य मिरवणुका काढण्यात आल्या. मिरवणुकीत घोडे, उंट यांच्यासह बालशिवाजी आणि जिजाऊ तसेच मावळ्यांच्या वेशातील देखाव्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले होते. मर्दानी खेळ, झांजपथक, डोलीबाजा, बँड, डॉल्बी तसेच भव्य एलईडी वॉल, रंगबेरंगी विद्युत रोषणाईने मिरवणुकीचा उत्साह ओसंडून वाहत होता.
शिवजयंतीनिमित्त पहाटेपासून विविध गडांवरून शहरात येणाऱ्या शिवज्योतींचे शिवाजी चौकात स्वागत करण्यात आले. यावेळी ‘शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता. सकाळी जन्मकाळ सोहळ्यानंतर दिवसभर छत्रपती शिवरायांच्या जीवनावर पोवाडे सुरू होते. शहरात अनेक ठिकाणी लहान-मोठ्या मिरवणुका निघाल्या.
सायंकाळी येथील उभा मारुती चौकातून श्री शिवाजी तरुण मंडळाच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला. श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते भव्य अशा अश्वारूढ १५ फूट उंच पुतळ्याचे पूजन करून मिरवणुकीला प्रारंभ झाला. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. महापौर हसिना फरास, आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार मालोजीराजे, मधुरिमाराजे, पोलिस अधीक्षक एम. बी. तांबडे हे प्रमुख उपस्थित होते. यावेळी अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
या मिरवणुकीत बैलगाड्यांवर प्रबोधनात्मक पोस्टर उभारली होती. मिरवणुकीत झांजपथक, स्वराज्य ढोल-ताशा पथक, सिद्धनाथ बँड पथक, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके तसेच डॉल्बीवर शिवरायांचा जयघोष, भव्य एलईडी वॉलवर शिवाजी पेठेतील सर्व तालीम संस्थांची व पदाधिकाऱ्यांची माहिती दाखविण्यात येत होती. मिरवणुकीत अनेक नेते, कार्यकर्ते भगवे फेटे परिधान करून सहभागी झाले होते. मिरवणूक निवृत्ती चौक, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महानगरपालिका, महाराणा प्रताप चौक, आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक, शिवाजी चौक, गुजरी, महाद्वार रोड, ताराबाई रोड, साकोली कॉर्नरमार्गे रात्री उशिरा पुन्हा उभा मारुती चौकात आली. या मिरवणुकीत श्री खंडोबा व श्री म्हाळसादेवींंच्या लग्नाचा ‘जय मल्हार’ मालिकेतील सजीव देखावा साकारला होता.
या मिरवणुकीत अध्यक्ष सुजित चव्हाण, उपाध्यक्ष अजित राऊत, कार्याध्यक्ष सचिन चव्हाण, सुरेश जरग, माजी आमदार सुरेश साळोखे, उत्तम कोराणे, महेश जाधव, अशोकराव साळोखे, चंद्रकांत यादव, चंद्रकांत साळोखे, लाला गायकवाड, दौलतराव राऊत, भरत जाधव, माजी महापौर बाजीराव चव्हाण, प्रल्हाद चव्हाण, संजय पवार, दुर्गेश लिंग्रस, अशोकराव जाधव, सदाभाऊ शिर्के, विजय माने, मोहन साळोखे, बबन कोराणे, आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
बालशिवाजी, जिजाऊ
मिरवणुकीत घोडे, उंट सहभागी होते. शिवाय पारंपरिक वेशातील बालशिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज, तसेच जिजाऊ व मावळे हे साऱ्यांचे लक्ष वेधत होते.
‘मी... शिवाजी पेठेचा’
मिरवणुकीत मोठ्या आवाजाचा डॉल्बी आणि एलईडी वॉलचा सहभाग होता. या डॉल्बीवर शिवचरित्र, पोवाड्यासह ‘मी... शिवाजी पेठेचा’ ही धून साऱ्यांचे लक्ष वेधत होती.
संस्थानचा शिवजन्मोत्सव
छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टच्या वतीनेही श्री शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. पालखी सकाळी १० वाजता येथील भवानी मंडपातून लवाजम्यासह संस्थानच्या नर्सरी येथील देवालयात (डॉ. आंबेडकर हॉल) आली.
तेथे शाहू छत्रपती, मालोजीराजे आणि यशराजे यांच्या हस्ते शिवपूजन करून जन्मसोहळा करण्यात आला. यावेळी शाहू संगीत विद्यालयाच्या वतीने शास्त्रीय संगीत आणि शाहीर आझाद नायकवडी यांचा पोवाड्याचा कार्यक्रम झाला. यावेळी राजवाड्यावर आलेल्या इंग्लंडच्या पाहुण्या एंड्रीन मायर तसेच राजेंद्र मोहिते, राजेंद्र चव्हाण, प्रसन्न मोहिते, प्रवीण इंगळे, आदी सहभागी झाले होते.
हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
मिरवणुकीला प्रारंभ झाल्यानंतर शिवजयघोष करण्यात आला. याचवेळी आकाशातून हेलिकॉप्टरमधून अश्वारूढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. मिरवणूक हळूहळू निवृत्ती चौकापर्यंत सरकत होती. या दरम्यान किमान पाच वेळा हेलिकॉप्टरमधून पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. आकाशातून होणारी ही पुष्पवृष्टी आपल्या नजरेत सामावून घेण्यासाठी शिवभक्तांचा जनसागर लोटला होता. प्रत्येक वेळी पुष्पवृष्टी होताना शिवभक्तांच्या जयघोषाने परिसर दुमदुमत होता.
रामभाऊदादांची उणीव
शिवाजी पेठेतील प्रत्येक कार्यक्रमात रामभाऊदादांचा पुढाकार नेहमीच राहिला आहे; पण त्यांचे निधन झाल्याने त्यांची उणीव या मिरवणुकीवेळी प्रत्येकाला प्रखरतेने जाणवली. पण रामभाऊदादांचे भव्य असे पोस्टर या मिरवणुकीत सहभागी केल्याने ते साऱ्यांचे लक्ष वेधत होते.