शिवमय वातावरणात शिवराज्याभिषेक दिन

By admin | Published: June 7, 2017 01:05 AM2017-06-07T01:05:06+5:302017-06-07T01:05:06+5:30

जयघोषाचा अखंड गजर : राज्यातील १४ विद्यापीठांच्या एनएसएस स्वयंसेवकांची उपस्थित्ती; ढोलताशांच्या निनादाने शिवाजी विद्यापीठात चैतन्य

Shivrajyabhishek day in Shivamaya environment | शिवमय वातावरणात शिवराज्याभिषेक दिन

शिवमय वातावरणात शिवराज्याभिषेक दिन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : छत्रपती शिवरायांच्या जयघोषाचा अखंंड गजर आणि ढोलताशांच्या निनादात शिवाजी विद्यापीठात मंगळवारी ‘शिवराज्याभिषेक दिन’ साजरा करण्यात आला. विद्यापीठात सुरू असलेल्या ‘आव्हान’ शिबिरातील सहभागी १४ विद्यापीठांमधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) सुमारे १२०० शिबिरार्थी स्वयंसेवकांनी परिसरात चैतन्य निर्माण केले. त्यांच्या उत्साहाने विद्यापीठातील सकाळचे वातावरण शिवमय बनले.
‘आव्हान’मधील स्वयंसेवकांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती जमून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. यावेळी स्वयंसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाचा अखंड गजर, ढोलताशांचा निनाद यांच्या तालावर विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिनाची सकाळ शिवमय बनविली.
यावेळी ‘एन. एस. एस.’चे स्वयंसेवक अक्षय चव्हाण, तेजस घुलघुले यांनी केलेल्या शिवगर्जनेने उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभारले. नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या जोसेस वढाईने प्रेरणादायी शिवगीत सादर केले. सर्व मान्यवर ढोलताशांच्या गजरात विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोरील प्रांगणात जमले. कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, एन.एस.एस.चे समन्वयक डॉ. डी. के. गायकवाड, क्रीडा अधिविभागप्रमुख डॉ. पी. टी. गायकवाड, अधिष्ठाता डॉ. पी. एस. पाटील, डॉ. पी. डी. राऊत, ए. एम. गुरव, एन.डी.आर.एफ.चे निरीक्षक एस. डी. इंगळे, नागरबाई शिंदे, अनिता शिंदे, डॉ. डी. आर. मोरे, आदी उपस्थित होते.


शिबिरार्थींकडून अनोख्या पद्धतीने अभिवादन
शिबिरार्थींनी अत्यंत अनोख्या पद्धतीने शिवरायांना अभिवादन केले. राज्याच्या १४ विद्यापीठांतून आलेल्या स्वयंसेवकांची पन्हाळा, भिवगड, कन्हेरगड, रायगड आणि देवगिरी पाच गटांत विभागणी केली. त्यांना अनुक्रमे भगवा, पांढरा, हिरवा, आकाशी आणि गडद निळा असे पाच रंगांचे गणवेश देण्यात आले होते. यांपैकी पांढऱ्या गणवेशातील विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या पुतळ्याभोवती गोल कडे केले आणि इतर संघांनी पुतळ्याच्या बागेभोवती गोल कडे करीत रंगीबेरंगी स्वस्तिक साकारले.
शिवराय हे ज्ञानाचे प्रतीक
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ शौर्याचेच नव्हे, तर ज्ञानाचेही प्रतीक आहेत. म्हणूनच आज जगभर त्यांच्या युद्धनीतीचा आणि कुशल व्यवस्थापनशास्त्राचा अभ्यास केला जातो, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. शिंदे यांनी येथे केले. विद्यापीठात सकाळी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित विशेष समारंभात त्यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Shivrajyabhishek day in Shivamaya environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.