‘शिवराज्याभिषेक’तर्फे शनिवारपासून दुर्गसंवर्धन
By admin | Published: February 10, 2017 12:36 AM2017-02-10T00:36:39+5:302017-02-10T00:36:39+5:30
शिवजयंतीनिमित्त उपक्रम : गडांची करणार स्वच्छता
कोल्हापूर : शिवजयंतीनिमित्त अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे शनिवार (दि. ११) ते १९ फेब्रुवारीदरम्यान दुर्गसंवर्धन मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत राज्यातील १०० गडकोटांची स्वच्छता केली जाणार आहे, अशी माहिती समितीचे कार्याध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
कार्याध्यक्ष सावंत म्हणाले, रायगडावरील मेघडंबरीतील शिवमूर्ती महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींची प्रबळ इच्छाशक्ती, उत्स्फूर्त सहभागाचे प्रतीक आहे. तोच आदर्श पुढे ठेवून राज्यातील शेकडो गडकोट-किल्ल्यांच्या जतन, संवर्धन, संरक्षणासाठीची पुढची पावले समितीतर्फे उचलण्यात येणार आहेत. त्याची सुरुवात या मोहिमेद्वारे केली जात आहे.
मोहिमेची सुरुवात शनिवारी (दि. ११) सकाळी ८ वाजता पन्हाळगड येथून केला जाणार आहे. मोहिमेत कोल्हापूर, सांगली, सातारा, लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नाशिक, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, अहमदनगर, पुणे जिल्ह्यानतील १०० गडकोटांची स्वच्छता केली जाईल. यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती प्रमुख उपस्थित असणार आहेत. यावर्षी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा वाढदिवस ‘डिजिटल फलक मुक्त’साजरा करण्याचे समितीने ठरविले आहे. पत्रकार परिषदेस पर्यावरणप्रेमी उदय गायकवाड, कोल्हापूर जिल्हा हॉटेल मालक संघाचे उज्ज्वल नागेशकर, सन्मान शेटे, साक्षी पन्हाळकर, उदय घोरपडे, विष्णू जोशीलकर, अनिल चौगुले, संजय पवार, शहाजी माळी, राहुल शिंदे, विनायक फाळके, हेमंत साळोखे, राम यादव, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आपल्या परिसराची स्वच्छता करावी
या मोहिमेसाठी राज्यभरातील शिवभक्तांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केले आहे. ज्यांना गडकोटांवर जाणे शक्य नाही त्यांनी आपले शहर, ऐतिहासिक, सार्वजनिक ठिकाणी अथवा घराच्या परिसराची स्वच्छता करावी, असे आवाहन अमर पाटील यांनी यावेळी केले.