शिवसेनेने कर्नाटकच्या बसेस फोडल्या
By admin | Published: July 26, 2014 12:13 AM2014-07-26T00:13:02+5:302014-07-26T00:17:47+5:30
या घटनेची नोंद उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात झालेली नव्हती.
कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक यांच्यामधील येळ्ळूर या सीमाभागातील गावाचा सिमेंटचा ‘महाराष्ट्र राज्य’ असा उल्लेख असलेला फलक बंगलोर उच्च न्यायालयाच्या आदेशाने काढण्यात आला. त्याच्या निषेधार्थ शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह कार्यकर्त्यांनी कोल्हापूर येथील मध्यवर्ती बसस्थानकामध्ये उभ्या असलेल्या कर्नाटकच्या पाच बसेस फोडल्या. या घटनेची नोंद उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात झालेली नव्हती. सीमाभागातील येळ्ळूर या महाराष्ट्रालगतच्या गावाचा उल्लेख असलेला सिमेंटचा फलक कर्नाटक सरकारने मोठ्या पोलीस बंदोबस्तात आज, शुक्रवारी काढला. या संदर्भात बेळगाव येथील नागरिक भीमाप्पा गडाप यांनी बंगलोर उच्च न्यायालयात काही वर्षांपूर्वी ‘येळ्ळूर हे गाव कर्नाटकात असूनही त्याच्या सिमेंट फलकावर ‘महाराष्ट्र राज्य’ असा उल्लेख आहे. त्यामुळे हा सिमेंटचा फलक काढण्यात यावा,’ अशी याचिका दाखल केली होती. मात्र, महाराष्ट्र एकीकरण समिती व सीमाभागातील नागरिकांनी हा फलक काढण्यास सक्त विरोध केला होता. आज अंमलबजावणी होताच त्याचे पडसाद कोल्हापुरात उमटले. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकात उभ्या असलेल्या कर्नाटक राज्य परिवहनच्या (केए ४२ एफ ६८६, केए ४२ एफ ५५३, केए ४२ एफ १००८, केए २८ एफ १७४८ आणि केए ४२ एफ १६२०) या पाच बसेसची तोडफोड करीत मोठे नुकसान केले.