शिवसेनेला आता स्वाभिमानी संघटनेची सोबत
By admin | Published: May 5, 2017 10:45 PM2017-05-05T22:45:06+5:302017-05-05T22:55:15+5:30
ठाकरे-शेट्टी गट्टी : महाआघाडीच सर्वप्रथम भाजपच्या विरोधात
(विश्वास पाटील- कोल्हापूर : केंद्र व राज्यातही सत्तेत असलेल्या महाआघाडीतील महत्त्वाचा घटकपक्ष असलेला शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचीच आता भाजपच्या विरोधात चांगली गट्टी जमण्याची चिन्हे आहेत. नव्यानेच स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत या दोन पक्षांची युती झाली असून ‘स्वाभिमानी’चे संस्थापक खासदार राजू शेट्टी ही तिथे भाजपच्या विरोधात प्रचारातही उतरणार आहेत. पनवेल महापालिकेच्या २० प्रभागांतील ७८ जागांसाठी २४ मे रोजी मतदान होत आहे. अर्ज भरण्याची आज, शनिवारी शेवटची मुदत आहे. तिथे नगरपरिषद होती, तिथे शासनाने १ आॅक्टोबरला महापालिका केली आहे. तिथे भाजप व शिवसेना यांची युती होईल असे चित्र होते परंतु ती झालेली नाही. नगरपरिषदेत भाजपची सत्ता होती. भाजप व शेकापचे प्राबल्य असलेले हे शहर आहे. आता तिथे दोन्ही काँग्रेससह शेकापची महाआघाडी झाली आहे. भाजप रिपब्लिकन पक्षांसह रिंगणात उतरला आहे तर शिवसेनेला ‘स्वाभिमानी’ची संगत आहे. मुख्यत: ग्रामीण जनता व प्रश्नांशीही निगडित असलेल्या स्वाभिमानी संघटनेचे तसे कोल्हापूर शहरातही काहीच राजकीय स्थान नाही. भाजपने कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत त्यांना दोन जागा दिल्या होत्या परंतु तिथेही त्यांचा पराभव झाला. त्यामुळे पनवेल महापालिकेत तसा संघटनेचा शिवसेनेला कोणत्याच पातळीवर राजकीय लाभ होण्याची शक्यता नाही तरीही संघटनेचा पाठिंबा घेण्यामागे भाजपच्या विरोधातील महाआघाडीतीलच घटक पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न आहे. राज्यातील सत्तेत बसल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सातत्याने भाजप सरकारला डागण्या देत आहेत. परवाच त्यांनी उत्तर प्रदेशातील योगी व महाराष्ट्रातील निरूपयोगी सरकार, अशी बोचरी टीका फडणवीस सरकारवर केली आहे. राज्याच्या राजकारणात गेल्या निवडणुकीत जे ‘भाजपचे अत्यंत विश्वासू शिलेदार’ म्हणून महाआघाडीत सहभागी झाले तेच शिवसेना व स्वाभिमानी संघटना हे दोन पक्ष त्यांच्यापासून दूर गेले आहेत. खासदार शेट्टी यांनी तर राज्यातील सरकार उलथवून टाकण्याची हाळीच गुरुवारी कोल्हापुरात दिली आहे. त्यामुळे शिवसेनेने त्यांना बरोबर घेऊन राज्याच्या राजकारणात पुढे जाण्याचे धोरण अवलंबले आहे. लोकसभेनंतर जेव्हा विधानसभेला भाजप व शिवसेना स्वतंत्र लढली तेव्हा स्वाभिमानी संघटना भाजपसोबत गेली होती. त्यामुळे ती संगत सोडून आता संघटना शिवसेनेसोबत पाऊल टाकते आहे. पनवेल महापालिकेतील युती एका शहरापुरती असली तरी तिचा राजकीय परिघ असा आगामी राजकारणाशी जोडणारा आहे हे मात्र नक्की..!