शिवसेना, ‘स्वाभिमानी’ची भूमिका निर्णायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2017 12:45 AM2017-02-23T00:45:52+5:302017-02-23T00:45:52+5:30

जिल्हा परिषदेचे सत्ताकारण : अध्यक्षपद खुले असल्याने काँग्रेसमध्येही अंतर्गत राजकारण उफाळणार

Shivsena, the role of 'Swabhimani' is crucial | शिवसेना, ‘स्वाभिमानी’ची भूमिका निर्णायक

शिवसेना, ‘स्वाभिमानी’ची भूमिका निर्णायक

Next


कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा गुलाल लागण्यास काही तासच शिल्लक राहिले असताना मतदानानंतर जे संभाव्य चित्र पुुढे आले आहे, त्यानुसार शिवसेना व ‘स्वाभिमानी’ची भूमिका सत्ता ठरविण्यात निर्णायक राहील, असे दिसत आहे. काँग्रेस सर्वाधिक जागा मिळवून पुढे राहू शकतो तसे झाल्यास अध्यक्षपदावरून अंतर्गत राजकारण उफाळू शकते. पहिल्या अडीच वर्षांतील अध्यक्षपद खुले आहे.
मंगळवारी मतदान झाल्यानंतर नेत्यांसह कार्यकर्त्यांचाही बुधवारचा दिवस आकडेमोड करण्यात गेला. कोणत्या गावात कुणी मदत केली व कोण विरोधात गेले यासंबंधीच्या बेरीज-वजाबाक्या सुरू राहिल्या. मतमोजणीची व्यवस्था करण्यातही यंत्रणा व्यस्त राहिली.
आता जे संभाव्य चित्र पुढे आले आहे, त्यानुसार शिवसेना व स्वाभिमानीच्या हातात सत्ता कुणाची आणायची याच्या चाव्या राहतील, असे दिसते. शिवसेनेतही अंतर्गत गटबाजी जास्त आहे. आमदार चंद्रदीप नरके यांना काँग्रेससोबत त्यातही पी. एन. यांच्यासोबत जाण्यात अडचणी आहेत. आमदार प्रकाश आबिटकर व डॉ. सुजित मिणचेकर यांना तशी फारशी अडचण नाही. आमदार सत्यजित पाटील हे जनसुराज्य व भाजपच्या विरोधातच लढले असल्याने ते देखील काँग्रेसला पाठिंबा देऊ शकतील. आमदार उल्हास पाटील हे भाजपसोबतच होते. सहसंपर्क प्रमुख संजय मंडलिक यांना गेल्यावेळी आमदार सतेज पाटील यांनीच अध्यक्ष केले असल्यामुळे व लोकसभेला त्या दोघांचाही राजकीय शत्रू समान असल्यामुळे ते देखील काँग्रेससोबत राहतील.
मुंबईत शिवसेनेला काही जागा कमी पडल्या तर तिथे पाठिंबा देऊन कोल्हापुरात व इतरत्रही भाजपला पाठिंबा देण्याचा पर्याय आहे; परंतु शिवसेना त्यास कितपत तयार होते हा प्रश्नच आहे. कारण कल्याण-डोंबिवली निवडणुकीत शिवसेनेने भाजपची मदत घेतली; परंतु कोल्हापुरात मात्र शिवसेना भाजपसोबत गेली नाही. त्यामुळे शिवसेना यावेळेलाही भाजपला मदत करणार नाही, असेच भाजपलाही वाटते. तीच स्थिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे.
अध्यक्षपदाच्या शर्यतीत अमर व राहुल पाटील राहणार पुढे...
काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी चारच नावे स्पर्धेत आहेत. त्यामध्ये राहुल पाटील, संदीप नरके, महेश नरसिंगराव पाटील आणि अमर यशवंत पाटील यांचा समावेश आहे. त्यातील राहुल हा पी. एन. पाटील यांचा मुलगा आहे. तो एकदमच नवखा आहे. तीच स्थिती संदीप नरके यांची आहे शिवाय संदीप हा तसा काँग्रेसचा सक्रिय कार्यकर्ता नाही.
महेश पाटील हे मावळत्या सभागृहात शिक्षण सभापती होते. ते अभ्यासू असले तरी मवाळ आहेत. अमर पाटील हे जिल्हा परिषदेत चौथ्यांदा निवडून येत आहेत. त्यांनी यापूर्वी पंचायत समिती व जिल्हा परिषदेतही काम केले आहे. त्यांचे वडील यशवंत एकनाथ पाटील हे उपाध्यक्ष होते. सगळ््यात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या नावाला पी. एन. पाटील व सतेज पाटील यांच्याकडूनही पाठबळ मिळू शकते. नरके कुटुंबीयांचेही ते जवळचे पाहुणे आहेत.
यशवंत एकनाथ पाटील यांनी विनय कोरे यांच्या विरोधात सन २००४ ची विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढविली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीलाही हे नाव चालू शकते. पी. एन. हे काँग्रेसचे निष्ठावंत आणि पक्षात दबदबा असलेले नेते आहेत. त्यांनी मुलासाठी आग्रह धरला तर त्याचा पक्षालाही विचार करावा लागेल. काँग्रेसअंतर्गत ते स्वत:च्या म्हणून किती जागा निवडून आणतात त्यावर त्यांच्या मुलाची दावेदारी निश्चित होऊ शकेल.

Web Title: Shivsena, the role of 'Swabhimani' is crucial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.