शिवसेनेने ‘चेअरमन’ची गळपट्टी खुशाल धरावी
By Admin | Published: February 1, 2015 01:01 AM2015-02-01T01:01:44+5:302015-02-01T01:01:44+5:30
ऊसदराचे आंदोलन : कोतवालास बडवून उपयोग काय ?
विश्वास पाटील / कोल्हापूर
शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव दिला नाही म्हणून साखर सहसंचालकांना सळो की पळो करून सोडण्यापेक्षा आक्रमक शिवसेनेने व स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही साखर कारखान्यांच्या ‘चेअरमन’ची गळपट्टी धरून दर कधी देतोस, हे विचारण्याचे खुशाल धाडस दाखवावे, त्यांच्या मागे शेतकरीही उभे राहतील, अशा प्रतिक्रिया या उद्योगातून व्यक्त होत आहेत. काल, शुक्रवारीच प्रादेशिक साखर सहसंचालक वाय. व्ही. सुर्वे यांना कार्यालयातून हाकलून देण्याचे आंदोलन शिवसेनेने केले.
सत्ता तुमची, सहकारमंत्री हे कोल्हापूरचेच; जिल्ह्यातील २७ पैकी तीन वगळता सर्वच कारखान्यांनी ‘एफआरपी’ दिलेली असताना याच जिल्ह्यात हिंसक आंदोलन व्हावे हेच गमतीशीर आहे. बाजारात साखरेला दर नसल्याने ‘एफआरपी’ देणेही अडचणीचे बनले. राज्य व केंद्राच्या पातळीवर मदत मिळायला कालावधी आहे. तोपर्यंत साखर आयुक्तांच्या पातळीवर साखरजप्तीची कारवाईही झाली. अधिकार नसणाऱ्यांची गळपट्टी धरणे यात पुरुषार्थ कसला? त्यापेक्षा ‘एफआरपी’ न दिलेल्या कारखान्यांच्या चेअरमनना जाब विचारण्याचे धाडस शिवसेनेने करावे. आंदोलनातही सनसनाटीपणा शोधला जात आहे. सरकारमध्ये मंत्री असलेल्या पंकजा मुंडे, नितीन गडकरी, रावसाहेब दानवे यांच्यापासून ते सत्तारूढातील पाच-पंचवीस नेत्यांचे कारखाने आहेत. ते एफआरपी देण्याचे नाव काढायला तयार नाहीत. जिल्हा पातळीवरील एखाद्या अधिकाऱ्याची खुर्ची काढून घेण्यात शिवसेना धन्यता मानत आहे.