ShivSena-Vanchit Alliance: कार्यकर्त्यांच्या पातळीवर युती कितपत उतरते त्यावरच यश, राजकीय विश्लेषकांचे मत
By विश्वास पाटील | Published: January 24, 2023 02:28 PM2023-01-24T14:28:43+5:302023-01-24T14:29:29+5:30
ठाकरे-आंबेडकर युतीचे महाविकास आघाडीतही पडसाद उमटू शकतात
विश्वास पाटील
कोल्हापूर : शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे व वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात झालेली युती कार्यकर्त्यांच्या पातळीवर कितपत उतरते यावरच या युतीचे महाराष्ट्राच्या राजकारणातील भवितव्य अवलंबून असेल, अशी प्रतिक्रिया राजकीय अभ्यासकांतून व्यक्त झाली. ही युती झाल्यानंतर ‘लोकमत’ने त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर नक्की काय परिणाम होईल, हे जाणून घेतले. शिवसेनेतील फुटीनंतर एकटे पडलेल्या ठाकरे यांना नवीन मित्र जोडल्याचे मानसिक आधार या युतीतून मिळू शकतो.
राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर म्हणाले, उद्धव ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून परस्परविरोधी भूमिका असलेल्या लोकांशी युती करत आहेत. त्यांनी संभाजी ब्रिगेडशी आघाडी केली आहे. त्यानंतर आता आंबेडकर यांच्याशी युतीचा निर्णय घेतला. शिवसेनेतील बंडानंतरही मुंबईत ठाकरे गटाचे आजही वर्चस्व आहे. तिथे आंबेडकर यांना मानणाराही वर्ग आहे.
शिवसेनेची हिंदूत्वाबद्दलची आक्रमक भूमिका राहिली आहे. आणि आंबेडकर यांचा हिंदुत्व, सावरकर विचारधारा यांना विरोध राहिला आहे. त्यामुळे हे मतभेद कसे सांधणार हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी दोन्हीकडील नेत्यांना पुढाकार घ्यावा लागेल. कारण मतभेदाचे प्रदर्शन झाल्यास भाजप व शिंदे गट त्याचे भांडवल करण्यास टपून बसलेला असेल. म्हणून दोन्हीकडील नेत्यांना तोंडावर नियंत्रण ठेवावे लागेल.
राजकीय विश्लेषक डॉ. प्रकाश पवार म्हणाले, या युतीचा जास्त फायदा शिवसेनेला होऊ शकतो. परंतु शिवसेनेचा पारंपरिक मतदार आंबेडकर यांना स्वीकारणार का, हे पाहणे जास्त महत्त्वाचे आहे. आतापर्यंत परस्परविरोधी विचारधारेचे हे दोन पक्ष आहेत. त्यांचे हितसंबंध वेगवेगळे आहेत. आंबेडकर यांचा पक्ष चळवळीशी संबंधित आहे. शिवसेना तशी प्रस्थापित वर्गाचे राजकारण करते. गावपातळीवर हे घटक एकमेकांच्या विरोधात राहिले आहेत. त्यामुळे नेत्यांतील मनोमीलन कार्यकर्त्यांच्या पातळीवर घडवून आणण्याचे आव्हान असेल.
महाविकास आघाडीतही पडसाद
ठाकरे-आंबेडकर युतीचे महाविकास आघाडीतही पडसाद उमटू शकतात, असे या दोन्ही विश्लेषकांना वाटते. कारण राष्ट्रवादी हा बहुजन समाजाच्या नावाखाली मुख्यत: मराठ्यांच्या हिताचे राजकारण करणारा पक्ष आहे. फुटीनंतर शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींचे संख्याबळ कमी झाले आहे. त्यांना महाविकास आघाडीतील जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी नव्या युतीचा फायदा होऊ शकेल.
काही निरीक्षणे...
- आंबेडकर यांना मानणारा मतदार शिवसेनेकडे वळेल
- शिवसेनेचा पारंपरिक मतदार वंचितकडे वळवण्याचे आव्हान
- दोन्ही पक्षांच्या मतदारांनी युती स्वीकारली तर त्याचा मोठा लाभ दोघांनाही
- आंबेडकर यांना महाविकास आघाडीतील अन्य दोन पक्ष कितपत स्वीकारतात यावर प्रश्नचिन्ह