जयसिंगपुरात शिवसेनेचा मोर्चा
By Admin | Published: January 29, 2016 10:09 PM2016-01-29T22:09:08+5:302016-01-30T00:12:49+5:30
बांधकाम विभागाचे अधिकारी धारेवर : चौपदरीकरणाचे काम सुरू करण्याची मागणी
जयसिंगपूर : गेल्या पाच वर्षांपासून सांगली-कोल्हापूर महामार्गावरील रस्त्याचे काम अनेक कारणावरून बंद आह़े त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढून महामार्गावर वाहतूक करणे धोकादायक ठरत आहे. यामुळे तत्काळ रस्ते करण्यात यावेत, या मागणीसाठी शुक्रवारी दुपारी शिवसेनेने जयसिंगपूरच्या सार्वजनिक बांधकाम विभागीय कार्यालयावर मोर्चा काढला.
दरम्यान, तालुकाप्रमुख सतीश मलमे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता आर. एस. प्रभूणे यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करून धारेवर धरले. यावेळी काही काळ तणाव निर्माण झाला होता. प्रभूणे यांनी मागण्यांप्रश्नी वरिष्ठांना कळविण्याचे आश्वासन दिले. यावेळी मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले.
तालुकाप्रमुख मलमे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तमदलगे खिंड बायपास ते अंकली पूल चौपदरीकरणाचे काम व अंतर्गत रस्ते तत्काळ सुरू करण्याची मागणी केली. शासनस्तरावर आमदार उल्हास पाटील व अधिकारी यांच्यावतीने पाठपुरावा करूनही ठेकेदारांकडून काम बंद अवस्थेत आहे. त्यामुळे सांगली व कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनधारकांची व नोकरदारांची गैरसोय होत आहे. तसेच तमदलगे, निमशिरगाव, जैनापूर, दानोळी, कवठेसार, कोथळी, उमळवाड व चिपरी या भागांमधील शेतकऱ्यांचा भाजीपाला जयसिंगपूर, इचलकरंजी, कोल्हापूर व सांगली या मार्गाने शहरामध्ये जात असतो. त्यामुळे वाहनांची रहदारी जास्त असते. तसेच शालेय विद्यार्थ्यांचीही मोठी गैरसोय होत आहे. काम अपुरे असल्यामुळे जागोजागी खड्डे असल्याने अपघातांच्या घटना घडत आहेत. जयसिंगपूर रेल्वेस्थानक ते उमळवाड फाटा या रस्त्यांची अवस्था देखील दयनीय आहे. रस्त्याचे चौपदरीकरण व अंतर्गत रस्ते १५ दिवसांत तत्काळ सुरू करावेत; अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिली.
आंदोलनात जयसिंगपूर शहरप्रमुख सूरज भोसले, माणिक जगदाळे, मंगेश चौगुले, साजिदा घोरी, सुकुमार नेजकर, म्हागू नाईक, अरुण होगले, नेमगोंड पाटील, रतन पडियार, अरुण लाटवडे, सुनील शिंदे, जयपाल कोळी, आकाश शिंगाडे, विशाल माळी यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)