शिवसेनेचा डाव; भाजपवर घाव !

By admin | Published: January 15, 2017 01:05 AM2017-01-15T01:05:13+5:302017-01-15T01:05:13+5:30

जिल्हा परिषदेचे राजकारण : स्थानिक आघाड्या करण्याच्या निर्णयामुळे पैरा फेडण्यास सेना आमदार मोकळे

Shivsena's innings; Wound on BJP! | शिवसेनेचा डाव; भाजपवर घाव !

शिवसेनेचा डाव; भाजपवर घाव !

Next

राजाराम लोंढे ल्ल कोल्हापूर
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजप सोडून कोणाशीही आघाडी करण्यास शिवसेना संपर्कप्रमुखांनी ‘सिग्नल’ दिल्याने जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. विधानसभेला केलेल्या तडजोडीचा पैरा फेडण्यासाठी त्यांचा मार्ग मोकळा झाला असला, तरी ‘भाजप’च्या घोडदौडीला लगाम घालण्यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवरून खेळलेली ही खेळी आहे.
जिल्ह्यात शिवसेनेचे सहा आमदार आहेत. राजेश क्षीरसागर वगळता पाचही आमदार ग्रामीण भागातील असून, त्यांच्या कार्यकक्षेत्रात तब्बल ४४ जिल्हा परिषदेचे सदस्य येतात. तर सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक व माजी आमदार संजय घाटगे यांच्या कार्यक्षेत्रातील सहा अशा ५० जिल्हा परिषद मतदारसंघांवर शिवसेनेचा प्रभाव आहे. या सगळ्यांनी ताकदीने मतदारसंघनिहाय बांधणी केली, तर शिवसेनेचा झेंडा फडकण्यास कोणतीच अडचण येणार नाही; पण मंडलिक, घाटगे वगळता सगळ्यांनीच विधानसभेला कोणत्या तरी गटाशी तडजोड केल्याने त्याचा पैरा फेडावा लागणार असल्याने त्यांच्यासमोर धर्मसंकट आहे.
हातकणंगले मतदारसंघात डॉ. सुजित मिणचेकर यांना छुपी मदत होते. त्यामुळे ते इतर कोणत्याही निवडणुकीत आक्रमक भूमिका घेत नाहीत. गेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अखंड हातकणंगले तालुक्यात शिवसेनेची केवळ एक जागा निवडून आली. करवीर मतदारसंघात चंद्रदीप नरके यांना राष्ट्रवादी कॉँग्रेस उघड मदत करते.
त्या बदल्यात ‘भोगावती’ची निवडणूक असो, अथवा जिल्हा परिषदेच्या दोन मतदारसंघांत ते राष्ट्रवादीला बाय देतात.
पन्हाळ्यात कॉँग्रेसचे अमर पाटील व राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांना सोबत घेऊन नरके व आमदार सत्यजित पाटील यांना ‘जनसुराज्य’ला टक्कर द्यावी लागते. एका गायकवाड गटाचा पाठिंबा घेतल्याशिवाय शाहूवाडीचे मैदान मारता येत नसल्याने सत्यजित पाटील यांना विधानसभेला मानसिंगराव गायकवाड यांनी पाठबळ दिले. त्या बदल्यात जिल्हा परिषद निवडणुकीत सत्यजितआबांना गायकवाड यांना बळ द्यावे लागणार आहे. राधानगरी-भुदरगडमध्ये कॉँग्रेसने प्रकाश आबिटकर यांना विधानसभेला ‘हात’ दिला. त्यामुळे गेल्या अडीच वर्षांत येथे आबिटकर व काँग्रेस नेत्यांमध्ये समझोत्याचे राजकारण सुरू आहे. बहुजन विकास आघाडीने मोट बांधल्याने उल्हास पाटील विधानसभेत पोहोचले. त्यामुळे जिल्हा परिषदेला पाटील यांना शिवसेनेपेक्षा आघाडी सांभाळणे महत्त्वाचे ठरणार आहे. संजय मंडलिक, संजय घाटगे हे एकत्रित आहेत; पण जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीपासून येथील राजकारणाने ‘यू’ टर्न घेतला आहे. ऐनवेळी कोण कोणाबरोबर राहील, हे सांगता येत नाही. याची प्रचिती कागल नगरपालिका निवडणुकीत आली आहे. जर हे सर्व नेते ताकदीने लढले तर जिल्हा परिषदेवर शिवसेनेची एकहाती सत्ता येण्यात कोणतीच अडचण येणार नाही.
उल्हास पाटील यांची गोची होणार?
शिरोळ तालुक्यातील बहुजन विकास आघाडीच्या बळावर आमदारकी पदरात पाडून घेतलेल्या उल्हास पाटील यांची जिल्हा परिषद निवडणुकीत गोची होणार आहे.
आघाडीचे अनिल यादव, विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, अशोकराव माने यांच्यासह दिग्गजांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
भाजपबरोबर युती करण्यास मातोश्रीवरून विरोध झाला, तर त्यांच्यासमोर पेच निर्माण होऊन स्वबळ आजमावे लागणार आहे.
गगनबावड्यात कॉँग्रेसविरोधात सर्व एकत्र
गगनबावडा तालुक्यात आमदार सतेज पाटील व पी. एन. पाटील यांच्या विरोधात पी. जी. शिंदे (भाजप), आमदार चंद्रदीप नरके (शिवसेना), अनिल साळोखे (राष्ट्रवादी) व महादेवराव महाडिक (ताराराणी) अशी एकसंध मोट बांधली जाणार आहे. यासाठी महाडिक गटाकडून जुळण्या लावल्या आहेत.
भाजपची खेळी अन् सेनेचा व्यूह
कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नसल्याने सर्वच राजकीय पक्षांनी तडजोडीचे धोरण स्वीकारले आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दोन्ही काँग्रेसमधील मोहरे टिपण्यास सुरुवात केली आहे.
‘कमळ’ चिन्हावर किमान १५ ते २० सदस्य निवडून आणायचे, तसेच ताराराणी आघाडी व जनसुराज्य पक्षाला सोबत घेऊन जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याची खेळी मंत्री पाटील यांची आहे. ‘भाजप’ची रणनीती शिवसेनेने ओळखल्याने त्यांनी भाजप सोडून आघाड्या करण्याचे आदेश नेत्यांना दिले आहेत.
मंडलिक, संजय घाटगे एकत्रित आहेत; जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीपासून राजकारणाने ‘यू’ टर्न घेतला आहे. ऐनवेळी कोण कोणाबरोबर राहील, हे सांगता येत नाही.

Web Title: Shivsena's innings; Wound on BJP!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.