शिवसेनाच किंगमेकर
By admin | Published: February 24, 2017 12:55 AM2017-02-24T00:55:23+5:302017-02-24T00:55:23+5:30
भाजपची चौदा जागा जिंकून जोरदार मुसंडी
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अत्यंत अटीतटीने लढविल्या गेलेल्या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली. काँग्रेसला मावळत्या सभागृहातील जागा राखतानाही घाम फुटला. राष्ट्रवादीने कागलमध्ये पुन्हा घवघवीत यश मिळविले. शिवसेनेने १० जागा जिंकून जिल्हा परिषदेत सत्ता कुणाची आणायची, याच्या चाव्या आपल्याकडे घेतल्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मात्र शिरोळ तालुक्यात पीछेहाट झाली. तिथे संघटनेला कशीबशी एकच जागा मिळाली. जनसुराज्य शक्ती पक्षाने सहा जागा जिंकून दबदबा कायम राखला. कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडून मुलगा, सून, भाऊ अशा वारसदारांना मात्र मतदारांनी फेकून दिले. जिथे सगळी सत्ता एकवटली होती, तिथे पराभव व जिथे नव्या नेतृत्वाला संधी तिथे मात्र लोकांनी वारसदारांनाही स्वीकारल्याचे चित्र दिसले.
निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाक्यांची जोरदार आतषबाजी व गुलालाची उधळण करून आनंद साजरा केला. जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच इतक्या अटीतटीने निवडणूक झाली.
जिल्ह्यातील एकूण १२ पंचायत समित्यांपैकी सर्वाधिक ३ राष्ट्रवादीने जिंकल्या. काँग्रेसला २, जनसुराज्य व भाजप आघाडीला २, शिवसेनेला १, आमदार प्रकाश आबिटकर व दिनकरराव जाधव यांच्या शाहू आघाडीला भुदरगडमध्ये स्पष्ट सत्ता मिळाली; तर गडहिंग्लज, चंदगड आणि शिरोळ तालुक्यांत मात्र सत्तेचे त्रांगडे निर्माण झाले आहे. जिल्हा परिषदेत भाजपसह मित्रपक्षांची संख्या २५, तर दोन्ही काँग्रेससह अपक्षांची संख्या ३० वर जाते. शिवसेना १० व स्वाभिमानीकडे २ जागा आहेत. शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिल्यास भाजपच्या सत्तेचे कमळ फुलण्याचा मार्ग खुला होतो.
शिरोळमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खच्चीकरण करण्याची भाजपची रणनीती कमालीची यशस्वी झाली. हा तालुका म्हणजे ‘स्वाभिमानी’चा बालेकिल्ला समजला जाई; परंतु तिथे त्यांना एकच जागा राखता आली. गत निवडणुकीत त्यांच्या पाच जागा होत्या व दोन जागांवर निसटता पराभव झाला होता. ज्या मतदारसंघातून खासदार राजू शेट्टी यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली, तो उदगाव मतदारसंघही ‘स्वाभिमानी’ला राखता आला नाही. शिवसेनेसह दोन्ही काँग्रेसना एका जागेवर समाधान मानावे लागले. तिथे जातीच्या राजकारणाचाही प्रभाव पडल्याचे स्पष्ट दिसते. फारसे संघटनात्मक बळ नसताना भाजपने तीन जागा लढवून शंभर टक्के यश मिळविले.
जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवून इतिहास घडवायचा या ईर्ष्येने मैदानात उतरलेल्या पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुरेश हाळवणकर यांच्या प्रयत्नांना मतदारांनी यश दिले. या पक्षाने १४ जागा जिंकल्या. मावळत्या सभागृहात या पक्षाकडे एकच सदस्य होता. काँग्रेसनेही जिल्ह्णाच्या सत्ताकारणावरील वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना पुरते यश मिळाले नाही. आमदार सतेज पाटील यांनी गगनबावड्याचा गड राखला; तथापि कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात मात्र त्यांचा तीन ठिकाणी पराभव झाला. जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांना करवीर मतदारसंघातील सहापैकी तीन जागांवर विजय मिळविता आला. वडणगे, शिये, शिंगणापूर या टप्प्यात मात्र त्यांचा नेहमीप्रमाणे पराभव झाला. त्यामुळेही काँग्रेसची पिछेहाट झालीच; शिवाय विधानसभेलाही धोक्याची घंटा वाजली. करवीर तालुक्यातच काँग्रेसला चांगल्या यशाची अपेक्षा होती. शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांना करवीरमध्ये दोन व पन्हाळ्यात एकच जागा मिळाली. त्यांना भाऊबंदकी भोवल्याचे दिसते. माजी मंत्री जयवंतराव आवळे व प्रकाश आवाडे यांच्यातील राजकीय संघर्ष उफाळून आल्याने काँग्रेसचा हातकणंगले तालुक्यात पुरता धुव्वा उडाला. आवाडे यांनी आघाडी करून तिथे मुलगा राहुल याच्यासह दोन जागा निवडून आणून पक्षाची कशीबशी अब्रू राखली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी मात्र कागल तालुक्यात घवघवीत यश मिळविले. शांत राहून स्वबळावरच निवडणुकीस सामोरे जाणे त्यांनी पसंत केले व पाचपैकी तीन जागा मिळविल्याच; शिवाय प्रथमच पंचायत समितीची सत्ताही काबीज केली. तिथे भाजपच्या समरजित घाटगे यांनी प्रयत्न करूनही त्यांना मतदारांनी तिसऱ्या स्थानावर फेकून दिले. त्यांना पंचायत समितीचीसुद्धा एकही जागा जिंकता आली नाही. गत निवडणुकीत माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या चिन्हावर सर्व पाच जागा जिंकल्या होत्या. आता त्यांचा मुलगा संजय मंडलिक व माजी आमदार संजय घाटगे यांची आघाडी होती. त्यांनी शिवसेनेच्या चिन्हावर सर्व जागा लढविल्या; परंतु त्यांना दोनच जागांवर विजय मिळविता आला. त्यातही अटीतटीच्या लढतीत बोरवडेमधून मंडलिक यांचा नातू वीरेंद्र हा पराभूत झाला. तिथे भूषण पाटील यांची बंडखोरी मंडलिक गटास महागात पडली. मूळच्या मंडलिक गटास तालुक्यात एकच जागा मिळाली.
भुदरगड तालुक्यात शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी काँग्रेसचे माजी आमदार दिनकरराव जाधव गटाशी आघाडी करून पाचपैकी चार जागा जिंकल्या. तिथे राष्ट्रवादीचे माजी आमदार के. पी. पाटील यांचा मात्र धुव्वा उडाला. काँग्रेसने एक जागा जिंकून अब्रू राखली. राधानगरी तालुक्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांना मर्यादित यश मिळाले. काँग्रेसकडून पी. एन. पाटील समर्थक दोन उमेदवार विजयी झाले. शिवसेनेचे आमदार आबिटकर यांचे समर्थक जाधव गुरुजी यांनी सुनेला निवडून आणून दबदबा राखला.
शाहूवाडीतून शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील व राष्ट्रवादीचे मानसिंगराव गायकवाड आघाडीने तीन जागा जिंकल्या तरी चुरशीच्या लढतीत त्यांना रणवीर गायकवाड यांचा पराभव मात्र रोखता आला नाही. आमदारांना पन्हाळ्यात या वेळेला खातेही खोलता आले नाही. पन्हाळ्यात ‘जनसुराज्य’चे नेते विनय कोरे यांच्याबद्दल नाराजी आहे, अशी चर्चा होती; परंतु मतदारांनी मात्र सावकारांना पुन्हा चांगले यश देऊन जिल्ह्णाच्या राजकारणातील त्यांचा दबदबा वाढविला. तिथे माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांचा मुलगा व काँग्रेसचा अध्यक्षपदाचा संभाव्य उमेदवार अमर पाटील यांना पराभव रोखता आला नाही.
गडहिंग्लजमध्ये राष्ट्रवादीला मात्र दणका बसला. तिथे भाजपला दोन व ताराराणी आघाडीला दोन जागा मिळाल्या. मुश्रीफ व आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्यासाठीही हा निकाल धोकादायक आहे. आजऱ्यात मतदारांनी काँग्रेस, राष्ट्रवादी व ताराराणीला समान यश दिले. तिथे ‘ताराराणी’ला अधिक जागा मिळतील, अशी हवा होती. भाजपची मूळची संघटनात्मक रचना असताना तिथे त्या पक्षाने एकही जागा लढविली नाही व ‘ताराराणी’त फंदफितुरी झाल्याने अपेक्षित यश मिळाले नाही. उमेश आपटे यांनी मात्र एकाकी किल्ला लढवीत बाजी मारली.
चंदगडमध्ये काँग्रेसची पिछेहाट झाली तरी भाजपलाही मतदारांनी स्वीकारले नाही. आमदार कुपेकर यांना दोन, तर काँग्रेसला दोन जागा मिळाल्या. नेत्यांनी आपलीच मुले आणि सून रिंगणात उतरल्याचा राग लोकांनी मतपेटीतून काढला.
जिल्हा परिषदेच्या ६७ जागा व पंचायत समितीच्या १३४ जागांसाठी मंगळवारी चुरशीने ७६ टक्के मतदान झाले होते. जिल्हा परिषदेसाठी ३२२ व पंचायत समित्यांसाठी ५८३ उमेदवार रिंगणात होते. तालुक्याच्या ठिकाणी गुरुवारी मतमोजणी झाली. करवीर तालुक्याची मतमोजणी मात्र रमणमळ्यातील शासकीय धान्य गोदामात झाली. एक गट व त्याखालील दोन गणांची मतमोजणी झाल्यानंतरच दुसरा गट मोजायला घेतला जात असल्याने मतमोजणी प्रक्रियेस विलंब लागला. त्यामुळे ही प्रक्रिया सायंकाळी संपली. निकालानंतर पुलाची शिरोली, नागाव, आदी ठिकाणी काँग्रेस व भाजपच्या कार्यकर्त्यांत हाणामारी झाली.
काँग्रेसला १४ जागा मिळाल्या असल्या, तरी आणखी जागा मिळणे अपेक्षित होते. सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. त्या दृष्टीने चर्चा सुरू केली आहे.
-आमदार सतेज पाटील
काँग्रेसला अपेक्षित यश मिळालेले नाही. सत्तेचे गणित कसे घालावयाचे याबाबत सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.
- पी. एन. पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय काँग्रेस
.........................................................................
—————-
पाच विद्यमान सदस्यांना पुन्हा संधी
भाजपच्या शौमिका महाडिक, अरुण इंगवले, भाजपच्या विजया पाटील, काँग्रेसचे उमेश आपटे व शिवसेनेच्या आकांक्षा अमर पाटील या पाच विद्यमान सदस्यांना पुन्हा संधी मिळाली आहे. कॉँग्रेसचे भगवान पाटील, बंडा माने, राष्ट्रवादीचे युवराज पाटील, ‘जनसुराज्य’चे सर्जेराव पाटील-पेरिडकर या चार माजी सदस्य सभागृहात पुन्हा येणार आहेत.